५ महिन्यांच्या पोटच्या पोराला बॅगेत भरून दिल सोडून; बापाची भावुक चिठ्ठीने डोळे पाणावतील.
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
अमेठी (वृत्तसंस्था) : आपल्या ५ महिन्याच्या मुलाला बेवारस सोडून जाण्याची वेळ बापावर आली. ही घटना वास्तवाचं भान आणून देते. आपल्या पोटच्या पोराला असं बेवारस सोडून देणं ही मोठी बाब आहे. मात्र समोर आलेल्या परिस्थिती मनावर दगड ठेवून बापाने मुलाला बेवारस सोडून दिलं. सोबत त्याने एक चिठ्ठीही सोडली. त्यामध्ये त्याने जे काही लिहिलंय ते वाचून तुमचे डोळेही पाणावतील.
उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातून हे प्रकरण समोर आलं आहे. अमेठी पोलिसांना हे पाच महिन्यांचं बाळ एका झोल्यात सापडलं आहे. मुशीगंज भागात पोलिसांनी हे बाळ सापडलं आहे. एका बापाने आपल्या पाच महिन्यांच्या मुलाला एका बॅगेत भरलं आणि पैसेही सोबत ठेवले. आणि एक भावुक चिठ्ठीही बाळासोबत ठेवली. चिठ्ठीत लिहिलं होतं की, मी पैसे पाठवत राहिन. काही महिन्यांसाठी माझ्या बाळाला सांभाळा. बॅगेतून बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर कंट्रोल रुमला याबाबत माहिती देण्यात आली होती. पोलिसांच्या टीमने जेव्हा बॅग उघडून पाहिली तेव्हा बाळासह कपडे, शूज, 5हजार रुपये आदी गरजेच्या वस्तू होत्या.
यासोबत एक चिठ्ठीदेखील मिळाली. ही चिठ्ठी बाळाच्या वडिलांनी लिहिल्याची शक्यता आहे. वडिलांनी चिठ्ठीत लिहिलं की, हा माझा मुलगा आहे. याला मी तुमच्याकडे सहा-सात महिन्यांसाठी सोड आहे. आम्ही तुमच्याबद्दल खूप चांगलं ऐकलं आहे. यासाठी माझा मुलगा तुमच्याकडे सोडत आहे. चिठ्ठीत पुढे लिहिलं की, मी 5000 रुपये प्रत्येक महिन्याला पाठवत राहिन. तुम्हाला हात जोडून विनंती आहे की, कृपया माझ्या बाळाला सांभाळा. माझी अडचण आहे. या बाळाला आई नाही. माझ्या कुटुंबात बाळाला धोका आहे. यासाठी 6-7 महिने तुमच्याकडे सोडत आहे. सर्व परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर मी बाळाला घेऊन जाईन. तुम्हाला आणखी पैशांची गरज असेल तर कळवा.