पाकिस्तानी महिला बेकायदेशीरपणे 30 वर्षं राहतेय भारतात; गावची सरपंचही झाली !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
लखनौ (वृत्तसंस्था): भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील वैर तसं जुनंच आहे. अनेकदा पाकिस्तानचे नागरिक बनावट ओळख तयार करत भारतात दीर्घकाळ राहत असल्याचं समोर येतं. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे.
उत्तर प्रदेश इथल्या इटा जिल्ह्यातील ही घटना आहे. एक 65 वर्षीय पाकिस्तानची नागरिक असलेली महिला इथे भारतात तीन दशकांपासून राहते आहे. इतकंच नाही, तर या महिलेनं गुडाऊ या गावच्या पंचायतीची हंगामी प्रमुख म्हणूनही काम केलं असल्याचं वास्तव समोर आलं आहे. मात्र तिच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही. बानो बेगम नावाच्या या महिलेनं आता खोटेपणा उघड झाल्यावर हंगामी पंचायत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हा पंचायतराज अधिकारी आलोक प्रियदर्शी यांनी ही माहिती दिली आहे. अधिकारी म्हणाले, की तिचा दीर्घकाळाचा व्हिसा अधिकृत असल्याचं सिद्ध झालं आहे. मात्र तिनं खोटेपणा करून रेशन आणि आधार कार्ड बनवून घेतली. तिला 2020 साली जालेसर तहसीलमधील गुडाऊ गावची हंगामी प्रमुख नियुक्त करण्यात आलं. शेहनाज बेगम या आधी त्या पदावर असलेल्या महिलेच्या मृत्यू झाल्यावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
इटाच्या जिल्हा न्यायाधीश सुलेखा भारती म्हणाल्या, की बानो बेगम अनधिकृतपणे राहत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या. तिनं रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड मिळवलं. जालेसरचे एसडीएम गुप्ता आणि डीपीआरओ आलोक प्रियदर्शी यांनी तपास केला असता दिलेल्या तक्रारी खऱ्या असल्याचं सिद्ध झालं. न्यायाधीशांनी सांगितल्यानुसार बानो बेगमचा विवाह 35 वर्षांपूर्वी अशरत अली याच्यासोबत झाला होता. पण तिनं भारतीय नागरिकत्व घेतलं नव्हतं. तिनं 1995 साली बेकायदेशीरपणे तिचं नाव मतदार नोंदवून घेतलं. आणि त्यानंतर रेशन कार्डही घेतलं होतं असं अधिकारी म्हणाले. याप्रकरणात अजून तरी गुन्हा नोंदवला गेला नाही. मात्र शक्य त्या सर्व बाजूंनी तपास केला जात असल्याचं जालेसरचे एसपी वर्मा यांनी सांगितलं आहे.