जगप्रसिद्ध कंपनीचा मालक कृष्णभक्तीत लीन, केला हिंदू धर्माचा स्वीकार !
कोलकाता (वृत्तसंस्था)। श्रीकृष्ण जन्माष्टमी भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिन. दशवतारांमधील पूर्णावतार मानल्या जाणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचे भक्त केवळ भारतातच नाही तर साता समुद्रापारही आहेत. दरम्यान, जगप्रसिद्ध अमेरिकन कारनिर्माता कंपनीचे मालक अल्फ्रेड फोर्ड यांनाही कृष्णभक्तीची ओढ लागली आहे. याच कृष्णभक्तीच्या ओढीने त्यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला असून, अम्बरिश दास हे नाव धारण केले आहे. कृष्णभक्तीमुळे आपल्या जीवनाला पूर्णत्व आल्याचे दास यांनी सांगितले.
अम्बरिश दास (अल्फ्रेड फोर्ड) हे सध्या बंगालमधील नादिया जिल्ह्यातील मायापूर येथे ११३ मीटर उंच अशा भव्य श्रीकृष्ण मंदिराची निर्मिती करत आहेत. निर्माणाधीन असलेल्या या मंदिराचे नामकरण श्री मायापूर चंद्रोदय असे करण्यात आलेले आहे. या मंदिराचा एक लाख चौरस फूट आकाराचा भाग तयार झाला आहे. तर उर्वरित मंदिर २०२२ पर्यंत आकार घेण्याची शक्यता आहे. आपल्या कृष्णभक्तीबाबत अम्बरिश दास (अल्फ्रेड फोर्ड) सांगतात की, कृष्णभक्तीने मला पूर्णत्व दिले आहे. जन्म घेतल्यापासून मी भौतिक सुख-संपत्ती आणि मोहमायेत गुंतलो होते. माझ्याकडे सर्वकाही होते. मात्र माझ्या आत काहीतरी अपूर्णत्व आहे, असे मला वारंवार वाटे. माझ्यातील या अपूर्णत्वाचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला. यादरम्यान मी गुरू महाराज श्रील प्रभुपाद यांना भेटलो. त्यानंतर मी श्रीकृष्णाच्या माध्यमातून माझ्यातील अपूर्णत्वाचा शोध घेतला. हे मंदिर माझ्या गुरूंचे स्वप्न आहे. त्यामुळे ते स्वप्न पूर्ण करून त्यांच्या चरणी अर्पण करणे हे आता माझ्यासमोरील उद्दीष्ट आहे. आपण अशा जगात राहतो जिथे प्रत्येकजण महत्त्वाकांक्षी आहे. इथे ईर्षा आहे. संघर्ष आहे. आपल्याकडे जे काही नाही ते मिळवण्यासाठी लोकांमध्ये चढाओढ सुरू आहे. त्यामुळे इथे नेहमीच स्पर्धा सुरू असते. मात्र कुणीही येथून जाताना काहीही घेऊन जात नाही. त्यामुळेच मी आणि माझी पत्नी या अध्यात्मिक जगामध्ये मोहमायेपासून दूर जाऊन खूप समाधानी आहोत. येथील प्रसन्नता स्थायी स्वरूपाची आहे. अल्फेड फोर्ड हे जगविख्यात कार निर्माता कंपनी फोर्ड मोर्टर्सचे संस्थापक हेन्री फोर्ड यांचे नातू आहेत. आता संपूर्ण जगात ते अम्बरीश दास या नावाने आणि कृष्णभक्तीसाठी प्रसिद्ध झाले आहेत. फेब्रुवारी-मार्च महिन्यात ते अमेरिकेतून पश्चिम बंगालमधील मायापूर येथे होणाऱ्या गौर पौर्णिमेसाठी सहपरिवार येतात. येथील चैतन्य महाप्रभूंच्या जन्मस्थळावर त्यांनी तब्बल ८०० कोटी रुपये खर्चून त्यांनी भव्य कृष्ण मंदिर उभे केले आहे.