चिंता वाढतेय! कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये पुन्हा दिसताहेत लक्षणं !
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। देशभरात कोरोनाचे थैमान पाहायला मिळत आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा लक्षणं दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या अनेक रुग्णांना आरोग्यासंबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दिल्ली सरकारच्या राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये कोविड-19 क्लिनिक सुरू होत आहे. यामध्ये कोरोनामुक्त रुग्णांमध्ये पुन्हा लक्षणं आढळल्यास त्याचं विश्लेषण केलं जाणार आहे.
कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी याचा अर्थ अनेकांना पुन्हा त्रास जाणवू लागला आहे. कोरोनातून लोक बरे होत आहेत. मात्र त्यानंतर देखील आता रुग्णांना श्वासोच्छवासाच्या तक्रारी आल्या आहेत. अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. बी.एल. शेरवाल यांनी दिली आहे. आम्हाला यासंदर्भात रूग्णांकडून बरेच फोनही आले आहेत. म्हणूनच पोस्ट कोविड-19 क्लिनिक सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. डॉ. बी. एल. शेरवाल यांनी ‘आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी आल्या आहेत. कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णाला श्वासोच्छवासाची समस्या असते. दुसर्या रुग्णाला खोकल्याचा त्रास होतो. त्याच वेळी, काही रुग्ण फुफ्फुसाचा आजार झाला. हे रुग्ण वेगवेगळ्या वयोगटातील आहेत’ असं म्हटलं आहे. कोरोनाच्या संकटात कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवू लागला तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 27 लाखांवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 52,889 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 64,531 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1092 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील रुग्णांचा आकडा 27,67,274 वर पोहोचला आहे.