ऑक्सिजन प्रेशर कमी झाल्यामुळे 15 रुग्णांचा मृत्यू! आधीही 26 रुग्णाचा मृत्यू
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
पणजी/वृत्तसंस्था: ऑक्सिजन प्रेशर कमी झाल्यामुळे गोव्यातील रुग्णालयात 15 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. धक्कादायक म्हणजे दोन दिवसापूर्वीच ऑक्सिजन अभावी 26 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता आणखी 15 रुग्णांनी ऑक्सिजन अभावी जीव गमावला आहे.
वृत्तसंस्था एएनआईच्या मते, “ऑक्सिजन पुरवठ्याअभावी रात्री दोन ते पहाटे सहापर्यंत रुग्णांचा मृत्यू झाला”.एका रुग्णाच्या मित्राने केलेला दावा अतिशय गंभीर आहे. त्याच्या दाव्यानुसार, या रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दररोज 20-25 जणांचा मृत्यू होतो. या दाव्यात कितपत तथ्य आहे, हा संशोधनाचा मुद्दा आहे. मृतांच्या नातेवाईकांच्या दाव्यानुसार, जोपर्यंत गोवा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात जोपर्यंत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाला, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. यापूर्वी गोव्यातील याच रुग्णालयात तब्बल 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळीही ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं. दरम्यान, सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, सध्या जे मृत्यू झाले त्याचं नेमकं कारण काय याचा शोध सुरु आहे.