राष्ट्रीय लोकअदालतांचे जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये २२ मार्च रोजी आयोजन
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l अनेक वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या प्रकरणांमध्ये जलदगतीने तोडगा काढण्यासाठी तसेच सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार देशभरात राष्ट्रीय लोकअदालतांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये दिनांक २२ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नागरी वाद, मोटार अपघात प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मजुरी दावे, दिवाणी प्रकरणे, न्यायालयीन प्रक्रियेत असलेले थकबाकीचे प्रकरणे तसेच इतर तडजोडीयोग्य प्रकरणे सोडविण्यात येणार आहेत. न्यायालयीन प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी आणि प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी नागरिकांनी आपल्या प्रकरणांचा राष्ट्रीय लोकअदालतीत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने केले आहे.
लोकअदालतीमध्ये प्रकरणे सोडवण्यासाठी तडजोडीला महत्त्व दिले जाईल. यामुळे संबंधित पक्षकारांना वेळेची आणि पैशांची बचत होईल तसेच प्रकरणांचा निकाल जलद गतीने लागेल. ज्या नागरिकांना त्यांची प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीत सोडवायची असतील त्यांनी २२ मार्चपूर्वी आपल्या वकिलांशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.