कोरोना लशीचे दोन डोस घ्यावेच लागणार, लसीकरणाचा शुभारंभ
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। कोरोनावर मात करण्यासाठी अखेर भारतात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ‘दोन टप्यात कोरोना लसीकरण होणार असून दोन डोस घेणे गरजेचं असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधून कोरोना लसीबद्दल सविस्तर माहिती दिली.
‘मी सगळ्यांना पुन्हा सांगू इच्छितो की कोरोना लसीचे 2 डोस घेणे आवश्यक आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये एका महिन्याचे अंतर असेल. दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यानंतर आपल्या शरीरात कोविड 19 विरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होणे सुरू होईल’, असं मोदी यांनी सांगितले. तसंच, ‘लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 3 कोटी जणांना लस देण्यात येईल तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 30 कोटी जणांना लस देण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये वृद्ध व्यक्ती, गंभीर आजार असलेल्या व्यक्ती आदींचा समावेश असेल लसीकरणाचे हे प्रमाण ऐतिहासिक असेल, असंही मोदी म्हणाले.
‘ज्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता सर्वाधिक आहे, त्यांना सर्वात आधी कोरोनाची लस दिली जाणार आहे. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी हे कोरोना लशीचे पहिले हक्कदार असणार आहे. मग शासकीय डॉक्टर असतील किंवा खासगी असतील, त्या सर्वांना सर्वात आधी लस दिली जाणार आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणारे पोलीस, कर्मचारी, जवानांना कोरोनाची लस दिली जाणार आहे . यांची संख्या तीन कोटी इतकी आहे. यां कोरोना लशीचा खर्च हा केंद्र सरकार उचलणार आहे, अशी घोषणाही मोदींनी केली. ‘कोरोना लसीकरण आता सुरू झाले आहे. संपूर्ण देशातील लोकांचं मी अभिनंदन करतो. कोरोनावर लस तयार करण्यासाठी डॉक्टरांनी जीवाचे रान केले. त्यांनी सण पाहिले नाही, ना उत्सव पाहिले नाही. लस तयार करण्यासाठी अनेक वर्षांचा कालवधी लागत असतो. पण, अवघ्या काही महिन्यात डॉक्टरांनी करून दाखवले आहे. आता मेड इन इंडिया असलेल्या दोन लशी उपलब्ध झाल्या आहे, असे गौरवद्गार मोदींनी काढले.
कोव्हिन डिजीटल प्लॅटफॉर्मवर (cowin app) लस घेण्यासाठी व्यवस्था केली आहे. या अॅपमधून पहिली लस दिल्यानंतर दुसरी लस कधी देणार आहे, याची माहिती दिली जाईल. कोरोना लसीचे दोन डोस घेणे गरजेचं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लशीचा डोस घेण्यामध्ये एक महिन्याचा वेळ लागतो. लस लागल्यानंतर तुम्ही बिनधास्तपणे वागू नका, मास्क वापरणे सोडू नका, सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडू नका. लस घेतल्यानंतर सुद्धा हे नियम कायम राहणार आहे. लहान मुलांना जी पोलिओचे डोस दिले जातात ते भारतातच तयार होती. भारताची कोरोना लस ही निर्णायक विजय मिळवून देणार आहे. ही लस आपल्या आत्मनिर्भर आणि आत्मविश्वास वाढवण्यात मदत करणार आहे. संकट कितीही मोठे असले तरी आत्मविश्वास सोडला नाही. त्यामुळे धैर्याने लढा देऊया, असंही मोदी म्हणाले.