गाढ झोपेने घात केला…उंदीर मामा ६ महिन्याचं बाळ घेऊन गेला…
नवी दिल्ली,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। एक धक्कादायक घटना समोर आली असून एका ६ महिन्यांच्या बाळाला उंदरांनी कुरतडून खाल्लं. बाळ त्याच्या पाळण्यात आरामात झोपलं होतं. तेव्हाच उंदरांनी त्याच्यावर हल्ला केला. असं सांगितलं जात आहे, की उंदरांनी मुलाला ५० पेक्षा जास्त वेळा चावा घेतला. इतकंच नव्हे तर त्याचं शरीरही कुरतडलं. दुसऱ्या दिवशी सकाळी बाळ रक्ताच्या थारोळ्यात दिसल्याने पालकांना ही घटना कळली.
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, ही घटना इंडियानामधे बुधवारी घडली. सकाळी जेव्हा मुलाचे आई-वडील डेव्हिड आणि एंजल शोनाबाम आपल्या मुलाला पाहायला गेले तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांच्या बाळाच्या शरीरातून रक्तस्त्राव होत असल्याचं त्यांनी पाहिलं. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळ गाठून दोन्ही पालकांना ताब्यात घेतलं. मुलाची योग्य काळजी न घेतल्याचा आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांवर केला जात आहे. या घटनेतील आरोपींमध्ये आई-वडिलांशिवाय मुलाची मावशी डेलानिया थुरमन हिचंही नाव आहे. पोलिसांनी डेलानियालाही अटक केली आहे, जी त्याच घरात राहायची.
अहवालानुसार, मुलाचा गाल, नाक, कपाळ, पाय, हात, मांड्या, हात आणि पायाची बोटे यावर उंदीर चावल्याच्या अनेक खुणा आहेत. ज्यातून खूप रक्तस्त्राव झाला होता. पोलिसांनी सांगितलं की, उंदरांनी मुलाचा उजवा हात कोपरापर्यंत कुरतडला होता. त्याच्या बोटांच्या काही भागालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे हाडे बाहेर आली होती. या घटनेनंतर मुलाला ताबडतोब इंडियानापोलिस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
या घटनेबाबत पोलिसांनी सांगितलं की, या बाळाला तीन आणि सहा वर्षांचे भाऊ-बहीण आणि दोन आणि पाच वर्षांचे चुलत भाऊ आहेत. हे कुटुंब ज्या घरात राहत होतं, त्या घरात अस्वच्छता होती. संपूर्ण घर कचरा आणि उंदरांनी भरलेलं होतं. मुलाच्या वडिलांनी सांगितलं की, मार्चपासून उंदरांचा हा त्रास सुरू झाला. घरातील मुलाला उंदीर चावण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी घरातील आणखी दोन मुलांना झोपेत उंदरांनी चावा घेतला होता.