राम मंदिर उद्घाटन : २२ जानेवारी रोजी सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट व जिल्हा कोर्टाला सुट्टी?
नवी दिल्ली,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी रोजी केले जाणार आहे. यानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर बार काऊंसिल ऑफ इंडियाने सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना पत्र लिहिले असून सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट आणि जिल्हा कोर्ट इत्यादींना सुट्टी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे निर्णय आता सरन्यायाधीशांच्या कोर्टात आहे.
२२ जानेवारीला बार काऊंसिल ऑफ इंडियाने सुट्टी देण्याची मागणी केली आहे. त्यांनी या संदर्भातील पत्र सरन्यायाधीश चंद्रचूड यांना लिहिलं आहे. त्यामुळे सरन्यायाधीश काय निर्णय घेतात याकडे लक्ष असणार आहे. १६ जानेवारी पासूनच अयोध्येत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. राम मंदिरात विविध पूजा विधी पार पाडले जात आहेत. राम लल्लाची मूर्ती गर्भगृहात स्थापन करण्यात आलीये.
२२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या दिवशी देशातील विविध भागात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक खासगी कार्यालयांनी यादिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर केलीये. पंतप्रधान मोदी यांनी या दिवशी प्रत्येक घरात दीप प्रज्वलन करण्यास सांगितलंय.
बार काऊंसिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहिलंय. ते म्हणालेत की, राम मंदिर उद्घाटनाची सांस्कृतिक मान्यता आणि राष्ट्रीय महत्व याचा स्वीकार करत २२ जानेवारी २०२४ रोजी सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट आणि जिल्हा सत्र कोर्ट यांना सुट्टी जाहीर करण्यात यावी.
सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ अधिवक्ता मनन कुमार मिश्रा म्हणाले की, अधिवक्ता आणि न्यायालयातील कर्मचारी यांना अयोध्या आणि देशातील इतर ठिकाणी आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांना पाहण्यासाठी किंवा त्यात भाग घेण्यासाठी संधी मिळावी. ते पत्रात म्हणालेत की, तात्काळ सुनावणीचे प्रकरणं पुढच्या दिवशी किंवा विशेष व्यवस्थेद्वारे पार पाडले जाऊ शकतात. त्यामुळे या ऐतिहासिक क्षणासाठी लोकांच्या भावना लक्षात घेऊन योग्य निर्णय घेण्याची मी विनंती करत आहे.