डेल्टाक्राॅन व्हेरिएंटच्या रुपाने देशात कोरोनाची चौथी लाट ? काही राज्यांमध्ये नवीन व्हेरिएंटचे रग्ण
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भारतात कोरोनाची तिसरी लाट ओसरली असून बरेच निर्बंध हटवण्यात आले आहेत. असं असताना देशात कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. या व्हेरिएंटमुळे चौथी लाट येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा डेल्टाक्राॅन (Deltacron) हा नवीन व्हेरिएंट आढळला आहे. तो ओमिक्राॅन आणि डेल्टा एकत्र येऊन तयार झाला आहे. देशात त्यांचा संसर्ग सुरु झाला आहे. सध्या सात राज्यांमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. त्या सर्वांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.
कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि दिल्ली या सात राज्यांमध्ये डेल्टाक्राॅनचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाची तिसरी लाट ओसरली असताना डेल्टाक्राॅन व्हेरिएंटच्या रुपाने चौथी लाट तर येणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र डेल्टाक्राॅन किती घातक असू शकतो आणि त्याची लक्षणे कोणती हे पाहणे गरजेचे आहे. व्हेरिएंटचे रुग्ण कमी असल्याने तो किती गंभीर स्वरुप घेईल हे आताच सांगत येत नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
डेल्टाक्राॅनची लक्षणे भोवळ आणि थकवा येणे ही दोन प्रमुख लक्षणे आहेत. विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी ही लक्षणे दिसू लागतात.