दिलासा ; एका दिवसात एक लाखाहूनही कमी बाधित रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ
Monday To Monday NewsNetwork।
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत ८६ हजार ४९८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २ हजार १२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ८२ हजार २८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या आकेडवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशामध्ये ८६ हजार ४९८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. एका दिवसात एक लाखाहूनही कमी बाधित आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर देशातल्या कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आजही बाधितांच्या संख्येपेक्षा जास्तच आहे. देशात काल दिवसभरात एक लाख ८२ हजार २८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या १३ लाख ३ हजार ७०२ झाली आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्याही दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. काल दिवसभरातल्या देशातल्या मृत्यूंची संख्या २,१२३ इतकी आहे. त्यामुळे देशातल्या कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या आता तीन लाख ५१ हजार ३०९ वर पोहोचली आहे.
देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमही वेगात सुरु आहे. गेल्या २४ तासात देशातल्या ३३ लाख ६४ हजार ४७६ नागरिकांनी लस घेतली. त्यापैकी ३० लाख ३८ हजार २८९ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या तीन लाख २६ हजार १८७ इतकी आहे.