दुसऱ्या लाटे पेक्षा तिसरी लाट कमी विध्वंसक ; वैज्ञानिकांचा दिलासादायक अंदाज
Monday To Monday NewsNetwork।
नाविदिल्ली(वृत्तसंस्था)। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजविलेला असताना पुढील दोन-तीन महिन्यांत तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही लाट आधीपेक्षा भयंकर असेल असे म्हटले जात आहे. मुलांसाठी धोकादायक असेल असेही अंदाज वर्तविले आहेत. मात्र, कोरोनावरील सरकारी समितीच्या वैज्ञानिकांनी कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्यापेक्षा खूप कमी विध्वंसक असेल असे सांगत मोठा दिलासा दिला आहे.
कोरोना रुग्ण संख्येवर लक्ष ठेवणाऱ्या एका केंद्र सरकारच्या समितीच्या वैज्ञानिकाने ही बाब सांगितली आहे. कोरोनाचे जर कोणते नवीन रुप उत्पन्न झाले तर तिसरी लाट वेगाने पसरू शकते. ‘सूत्रा मॉडेल’ आणि कोरोनाच्या गणितीय अनुमानामध्ये सहभागी असलेले मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितले की, तिसऱ्या लाटेच्या तीन शक्यता आहेत. एक आशावादी, मध्यवर्ती आणि निराशावादी.
विज्ञान आणि उद्योग विभागाने गेल्यावर्षी गणितीय मॉडेलचा उपयोग करून कोरोना व्हायरसच्या रुग्ण वाढीचा अंदाज लावण्यासाठी एका समितीचे गठन केले होते. मात्र, या समितीला दुसऱ्या लाटेचा अचूक अंदाज लावणे जमले नाही आणि कोरोनाची लाट दीड महिने लवकर आली. यामुळे या समितीवर टीकाही झाली होती. ही तीन सदस्यांची समिती आहे.
तिसऱ्या लाटेचा अंदाज लावताना लसीकरणाचा प्रभाव, कोरोनाचे खतरनाक स्वरूप आणि वेळेचा अंदाज घेण्यात आला आहे. हे दुसऱ्या लाटेच्या अंदाजावेळी करण्यात आले नव्हते. ‘आशावादी’ मध्ये आम्ही ऑगस्टपर्यंत सामान्य परिस्थिती आणि कोणताही नवीन म्युटेंट येणार नाही, असे गृहीत धरल्याचे अग्रवाल म्हणाले. तर ‘मध्यवर्ती’मध्ये आशावादीच्या शक्यता आणि लसीकरण २० टक्के कमी प्रभावी असे गृहीत धरले आहे. तर तिसऱ्या ‘निराशावादी’ अंदाजामध्ये जर ऑगस्टमध्ये नवीन कोरोनाचा म्यूटंट पसरू लागला तर तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. नाहीतर ऑगस्टच्या मध्यावर दुसरी लाट स्थिर होण्याची शक्यता आहे. तिसरी लाट ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या मध्यावर हाहाकार माजवू शकते. यामध्ये दिवसाला 1,50,000 ते 2,00,000 रुग्ण सापडण्याचा अंदाज आहे. हा अंदाज दुसऱ्या लाटेत सापडलेल्या रुग्णांपेक्षा निम्माहून कमी आहे.