निर्बंध वाढणार? धोका वाढला ! १५ जिल्ह्यांमधील कोरोना परिस्थितीनं चिंतेत भर
Monday To Monday NewsNetwork।
नवी दिल्ली(वृत्तसंस्था)। देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. सध्या देशातील बऱ्याच राज्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे बाजारपेठा, दुकानं, पर्यटनस्थळांवर गर्दी दिसू लागली आहे. त्यामुळे काही भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याबद्दलची माहिती दिली.
देशाचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट २.२५ टक्क्यांवर आला आहे. देशातील परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचं यातून अधोरेखित झालं आहे. मात्र महाराष्ट्र, केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याशिवाय ईशान्येकडील राज्यांमधील स्थिती बिघडल चालली आहे. देशात सध्या आढळून येत असलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण ९० जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यामुळे ९० जिल्ह्यांमधील स्थिती बिकट असल्याचं समोर आलं आहे.
देशात सध्या आढळून येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण केवळ ९० जिल्ह्यांमधले आहेत. यात महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यानंतर केरळ (१४), तमिळनाडू (१२), ओदिशा (१०), आंध्र प्रदेश (१०), कर्नाटक (१०), आसाम (६), पश्चिम बंगाल (४), मेघालय (२), मणीपूर (२), त्रिपुरा (१), गोवा (१), मिझोरम (१), पुद्दुचेरी (१), अरुणाचल प्रदेश (१) या राज्यांचा क्रमांक लागतो. देशातील ६६ जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १० टकक्यांहून अधिक आहेत. यातील सर्वाधिक जिल्हे अरुणाचल प्रदेशात आहे. अरुणाचल प्रदेशातील १० जिल्ह्यांमधील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांहून अधिक आहे. त्यानंतर राजस्थान (१०), मणिपूर (९), केरळ (८), मेघालय (६), आसाम (४), त्रिपुरा (३), ओदिशा (३) यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील २ जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांहून जास्त आहे.