आंतराष्ट्रीय

केंद्र सरकारची मोठी घोषणा,केंद्रीय कर्मचाऱ्यांचे Work From Home रद्द

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नवीदिल्ली,मंडे टू मंडे वृत्तसेवा। देशातील कोरोनाचा संसर्ग आणि तिसरी लाट ओसरत असल्याने केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व कर्मचाऱ्यांना सोमवार ७ फेब्रुवारीपासून कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून काम करावे लागणार आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरीएंटच्या वाढत्या संसर्गामुळे केंद्र सरकारने वर्क फ्रॉम होम (Work From Home) पद्धतीने काम देण्याचा निर्णय घेतला होता. पण वर्क फ्रॉम होम रद्द करण्यात येत असल्याचे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर हजर रहावे लागणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार याआधीची २५ टक्के ते ५० टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहून काम करण्याची अट आता रद्द करण्यात आली आहे.

कोरोनाच्या ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरीएंटमुळे संसर्ग रोखण्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले होते. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मदत होईल असा सरकारचा अंदाज होता. पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात रूग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची किंवा ऑक्सिजन पुरवठ्याची गरज भासली नाही. त्यामुळेच कोरोना रूग्णवाढीची संख्या नियंत्रणात राहिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही २५ ते ५० टक्के उपस्थितीची मुभा देण्यात आली होती. पण आता कोरोनाची देशातील आकडेवारी घसरत असल्यानेच सरकारने वर्क फ्रॉम रद्द करण्याच्या नव्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना सोमवारपासून कामावर हजर रहावे लागणार आहे.

केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारने आपआपल्या पातळीवर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम काम करण्यासाठीचे आदेश दिले होते. त्यानुसार अनेक कर्मचारी घरूनच काम करत आहेत. राज्य सरकार आता संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थितीबाबत काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. राज्य सरकारने याआधीच शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या बाबतीत पूर्ण वेळ शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अनेक खासगी कार्यालये तसेच बॅंकांनीही आता वर्क फ्रॉम होमचे आदेश रद्द केले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!