आत्ताची मोठी बातमी : महिला दिनी गॅस सिलिंडरच्या किमती १०० रुपयांनी स्वस्त – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महिलांना मोठी भेट
नवी दिल्ली,मंडे टु मंडे न्युज नेटवर्कl आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती १०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांत लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहे. त्यापूर्वी मोदी सरकारने गॅस सिलेंडरचे दर कमी करुन सर्वांना दिलासा दिला आहे. यापूर्वी गॅस सिलेंडरचे दर रक्षा बंधनच्या दिवशी कमी करण्यात आले होते. त्यानंतर आता दुसऱ्यांदा दर कमी करण्यात आले. दर कपातीनंतर दिल्लीत सिलेंडरची किंमत ९०३ रुपयांवरून ८०३ रुपये झाली आहे. जयपूरमध्ये ८०६.५० रुपये आणि पटनामध्ये ९०१ रुपयांमध्ये सिलेंडर मिळणार आहे. तसेच कोलकत्तामध्ये ९२९ रुपये, मुंबईत ९०२.५९ रुपयांमध्ये गॅस सिलेंडर मिळणार आहे.
Xवर दिली दर कपातीची माहिती
X वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट लिहिली आहे. त्यात म्हटले आहे की, “महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही गॅस सिलेंडरचे दर शंभर रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला शक्तीचे जीवन तर सुसह्य होईल. तसेच कोट्यवधी कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल. हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठी देखील उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य देखील सुधारेल.”