प्लाझ्मा थेरपी नंतर रेमडेसिवीर ही कोरोना उपचारातून वगळणार
Monday To Monday NewsNetwork।
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। प्लाझ्मा थेरपीला कोरोनाच्या उपचारातून वगळल्यानंतर लवकरच रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापरही बाद होण्याची शक्यता डॉ. डी. एस. राणा यांनी व्यक्त केली आहे. आयसीएमआर या संस्थेने दोन दिवसांपूर्वीच प्लाझ्मा थेरपीचा कोरोनाच्या उपचारात काहीही लाभ होत नसल्याने उपचार पध्दतीतून याला वगळले होते. यानंतर आता रेमडेसिवीर इंजेक्शनलाही यातून वगळण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोविड 19 च्या रुग्णांवर उपचार करताना रेमेडेसीवीर इंजेक्शनचा मोठा फायदा झाल्याचा कुठलाही पुरावा अद्याप मिळाला नाही. त्यामुळे, लवकरच हा निर्णय होण्याची शक्यता आहे, असे गंगाराम हॉस्पीटलचे प्रमुख डॉ. डी. ए. राना यांनी म्हटले आहे. रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारपद्धतीकडे बारकाईने पाहिल्यास, रेमेडेसीवीर इंजेक्शनामुळे रुग्णांना बरं होण्यासाठी मोठा फायदा झाल्याचा कुठेही सिद्ध झाले नाही. हे इंजेक्शन प्रभावी ठरल्यांचा कुठेही वस्तूनिष्ठ पुरावा नाही. त्यामुळे, लवकरच हे इंजेक्शनही कोविडच्या उपचारपद्धतीतून वगळण्यात येऊ शकते, असे डॉ. राणा यांनी सांगितलं.सद्यस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांसाठी केवळ तीनच औषधे महत्त्वाची व प्रभावशाली बनून काम करत आहेत. कोरोना महामारीवरील उपायांसाठी सातत्याने नवनवीन माहिती गोळा करण्याचा प्रयत्न वैद्यकीय यंत्रणा करत आहे. आम्ही सर्वचजण यावर बारकाईने लक्ष ठेऊन आहोत, असेही राणा यांनी सांगितलं.
कोरोनाच्या उपचारात रेमडेसिवीर उपयुक्त ठरत असल्याने या इंजेक्शनची मध्यंतरी अभूतपुर्व टंचाई निर्माण झाली होती. देशात अनेक ठिकाणी ही इंजेक्शनचे अव्वाच्या सव्वा किंमतीत विकण्यात आली होती. आता डॉ. राणा यांनी म्हटल्यानुसार रेमडेसिवीरला कोरोनाच्या उपचारातून वगळले तर या इंजेक्शनच्या नावाखालील काळाबाजार संपुष्टात येणार आहे.