मंदाताई खडसे यांना दिलासा : अटकपूर्व जामीन मंजूर
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई, प्रतिनिधी : भोसरी जमिन खरेदी प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकीनी खडसे यांना अखेर दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना तूर्तास अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी सत्र न्यायालयाने मंदाकीनी खडसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. मात्र, खडसेना आता दिलासा मिळाला आहे.
मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं. त्यांना अधीही अटक केलं जाण्याची शक्यता होती. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर न्यायालयात आज सुनावणी घेण्यात आली. यामध्ये मंदाकिनी खडसे यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. तसेच या कालावधीत त्यांनी ईडीला तपासकार्यात सहकार्य करावे असे निर्देश कोर्टाने दिले. मुंबई उच्च न्यायालयाने मंदाकिनी खडसे यांना अंतरिम दिलासा दिला आहे. ईडीच्या कारवाईनंतर त्यांची लगेच जामिनावर सुटका होईल. तसेच 17 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत मंदाकिनी खडसे यांना प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी ईडीसमोर हजर राहावे लागणार आहे. येत्या 21 ऑक्टोबरला मंदाकिनी खडसे यांनी विशेष न्यायालयासमोर हजर राहण्याचेदेखील आदेश देण्यात आले आहेत.