दिल्लीत घडामोडींना वेग, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडे देखील अमित शाह यांच्या दरबारात
नवी दिल्ली,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आज दिल्लीत भाजपच्या गोटात मोठ्या महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार गेल्या अनेक महिन्यांपासून रखडला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही म्हणून शिंदे गटातील आमदारांमध्ये धुसफूस असल्याच्या बातम्या अनेकदा समोर आल्या होत्या. विशेष म्हणजे काही आमदारांनी तर जाहीरपणे नाराजीदेखील व्यक्त केली होती. पण आता या आमदारांची नाराजी दूर होण्याची दाट शक्यता आहे. कारण राज्य मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारावर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे दिल्लीतील बैठकीसाठी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा देखील समावेश आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा मोठा असला तरी भाजपकडून सहकार क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या बैठकीसाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी बोलावल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री वगळता भाजप नेत्या पंकजा मुंडे देखील आज दिल्लीत अमित शाह यांच्या कार्यालयात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अमित शाह यांच्या कार्यालयात महत्त्वाची बैठक
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयात सहकार क्षेत्राशी संबंधित अतिशय महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलीय. याच बैठकीसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे दाखल झाल्या. त्यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले.
दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयात दाखल होण्याआधी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यांच्यासोबत आमदार अभिमन्यू पवार, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, सुजय विखे पाटील हे अमित शाह यांच्या कार्यालयात दाखल झाले. साखर क्षेत्राशी संबंधित महत्त्वाची बैठक मानली जात होती. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे अनेक ठिकाणी सहकार क्षेत्राची सूत्रे आहेत. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर काही रणनीती आखली जाते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दुसरीकडे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सहकार क्षेत्राची बैठक संपल्यानंतर अमित शाह यांची एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर खलबत होत असल्याची माहिती मिळत आहे. कदाचित मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.