देशात ३० जूनपर्यंत कडक निर्बंध लागू; केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश
Monday To Monday NewsNetwork।
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। कोरोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेता केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना येत्या ३० जूनपर्यंत कडक निर्बंध जारी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या जास्त असेल त्याठिकाणी स्थानिक पातळीवर नियंत्रण उपाययोजना केल्या जाव्यात. कोरोना रोखण्यासाठी सक्तीनं उपाययोजना लागू कराव्यात अशी सूचना केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी केल्या आहेत.
भल्ला यांनी आदेशात म्हटलंय की, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी सध्या कोरोनावर उपचार घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण राखण्यासाठी कडक पाऊलं उचलणं गरजेचे आहे. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांनी स्थानिक परिस्थिती, अत्यावश्यक सेवा याचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने लावलेले निर्बंधात सूट देण्याबाबत विचार करू शकतात.
केंद्र सरकारने २९ एप्रिलला दिलेल्या मार्गदर्शक सूचना ३० जूनपर्यंत लागू राहतील. गृहमंत्रालयाने सांगितल्यानुसार, ऑक्सिसन बेड्स,आयसीयू, व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका यांची पर्यायी व्यवस्था सुनिश्चित करावी. आवश्यकतेप्रमाणे तात्पुरते कोविड रुग्णालय उभारावे. गृहमंत्रालयाने ताज्या निर्णयात लॉकडाऊनबाबत काहीही भाष्य केले नाही. देशात कोरोना व्हायरसच्या घटत्या रुग्णसंख्येनुसार केंद्राने हे दिशा-निर्देश लागू केले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, भारतात कोरोना व्हायरसची एकूण रुग्णसंख्या २ कोटी ७३ लाख ६९ हजार ०९३ इतकी आहे. त्यातील ३ लाख १५ हजार २३५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान, कोरोना संक्रमित रूग्णांचा पॉझिटिव्हिटी दर कमी होत आहे, तर दुसरीकडे ब्लॅक फंगससह अन्य प्रकारची प्रकरणे वेगाने पुढे येत आहेत. सध्या फंगसच्या रूग्णांची संख्या १०० हून अधिक आहे. सध्या वैद्यकीय महाविद्यालयात १०६ रूग्ण आहेत, त्यापैकी ३९ रूग्णांवरही शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या रूग्णांपैकी एका रुग्णांमध्ये क्रीम फंगसची पुष्टी झाली आहे, तर ५० पेक्षा जास्त ब्लॅक फंगसचे रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना संक्रमित रूग्णांमध्ये अँटीबायोटिक औषधांचा जास्त वापर शरीरात पोटात आढळणाऱ्या सिम्बायोटिक बॅक्टेरियांना नष्ट करत आहे. कारण मानवी शरीरात सिम्बायोटिक बॅक्टेरिया असणे अत्यंत महत्वाची आहे. या बॅक्टेरिया फंगसचे निर्मूलन करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.