मोदी सरकारचा मोठा निर्णय; पाच किलो मोफत धान्य आणखी ‘या’ महिन्यापर्यंत मिळणार रेशनवर
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। केंद्र सरकारने मोफत अन्नधान्य वितरण कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना म्हणजेच PMGKAY या वर्षी सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची माहिती देताना अन्न आणि पुरवठा मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, सरकारने मोफत अन्नधान्य वितरण योजनेचा कालावधी सहा महिन्यांसाठी वाढवला आहे. आता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सप्टेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार आहे.
ही योजना 31 मार्च रोजी संपत होती
वर्ष 2020 पासून केंद्र सरकारकडून या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत रेशन दिले जात आहे. मार्च 2020 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना जाहीर करण्यात आली. सुरुवातीला ही योजना एप्रिल-जून 2020 या कालावधीसाठी सुरू करण्यात आली होती, परंतु नंतर ती 30 नोव्हेंबर 2021 आणि 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली.
अनुदानित अन्नधान्याव्यतिरिक्त मोफत रेशन दिले जाते
PMGKAY अंतर्गत 80 कोटींहून अधिक लोकांना दरमहा 5 किलो धान्य दिले जात आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) 80 कोटी शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशनसाठी ओळखण्यात आले आहे. त्यांना रेशन दुकानांमधून वितरीत करण्यात येणाऱ्या अनुदानित धान्याव्यतिरिक्त मोफत रेशन दिले जाते.
ही योजना फक्त शिधापत्रिकाधारकांपुरती मर्यादित
PMGKAY अंतर्गत मोफत अन्नधान्याचा लाभ ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही, त्यांना नाही. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही शिधापत्रिका धारकांपुरती मर्यादित आहे, म्हणजेच देशातील ज्या नागरिकांकडे शिधापत्रिका उपलब्ध आहे, त्यांना त्यांचा रेशनचा कोटा तसेच या योजनेंतर्गत अतिरिक्त रेशन मिळत आहे.