टास्कमास्टर शहांवर नवी जबाबदारी;कांग्रेसला धक्का देणार? महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींकडे लक्ष
Monday To Monday NewsNetwork।
नवी दिल्ली(वृत्तसंस्था)। केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार संपन्न झाल्यानंतर आता खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. अनेक महत्त्वाची खाती असलेल्या मंत्र्यांना आज नारळ देण्यात आल्यानं खातेवाटपाकडे लक्ष लागलं होतं. मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
पियूष गोयल यांच्याकडून रेल्वे मंत्रालय काढून घेण्यात आलं आहे. रेल्वेची जबाबादारी अश्विनी वैष्णव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. गोयल यांच्याकडे वस्त्रोद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाची जबाबदारी असेल. अरुण जेटली यांच्या निधनानंतर अर्थमंत्री म्हणून काम केलेल्या गोयल यांच्याकडे रेल्वेसारखं महत्त्वाचं खातं देण्यात आलं होतं. मात्र आता त्यांना डच्चू मिळाला आहे. स्मृती इराणी यांच्याकडून वस्त्रोद्योग मंत्रालय काढून घेण्यात आलं आहे. आता त्यांच्याकडे केवळ महिला आणि बालकल्याण मंत्रालयाचा कारभार ठेवण्यात आला आहे. पियूष गोयल, स्मृती इराणी यांचं महत्त्व कमी करण्यात आलं असताना अमित शहांकडे अतिशय महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. कालच स्थापन करण्याच आलेल्या सहकार मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या २४ तास आधी स्थापन करण्यात आलेल्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. सहकार क्षेत्रातील सर्वाधिक उद्योग महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातूनच सहकाराची सुरुवात झाली. त्यामुळे महाराष्ट्रातल्या नेत्याला या मंत्रालयाची जबाबदारी मिळेल, असा कयास होता. मात्र तसं झालेलं नाही.
पंतप्रधान मोदींनी सहकार मंत्रालयाची जबाबदारी त्यांचे अतिशय विश्वासू साथीदार असलेल्या अमित शहांकडे सोपवली आहे. महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये सहकार क्षेत्राचा व्याप मोठा आहे. काँग्रेसनं सहकाराच्या माध्यमातूनच आपली पाळंमुळं महाराष्ट्रात घट्ट रुजवली. काँग्रेसच्या अनेक नेत्यांचं राजकारण सहकाराच्या माध्यमातून चालतं. आता मोदींनी सहकार मंत्रालयाची जबाबदारी अमित शहांकडे सोपवली आहे. त्यामुळे येत्या काही काँग्रेसचे महत्त्वाचे नेते अडचणीत येऊ शकतात. महत्त्वाचे निर्णय अतिशय ठामपणे घेण्याचं कसब शहांकडे आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातील टास्कमास्टर मंत्री अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्याकडे सहकार मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आल्यानं येत्या काही दिवसांत सहकार क्षेत्रात मोठ्या घडामोडी पाहायला मिळू शकतात.