मृत्युपत्राद्वारे नाव लावण्यासाठी ५० हजाराची लाच : लिपिकासह पंटर एसीबीच्या जाळ्यात
Monday To Monday NewsNetwork।
नाशिक, मंडे टू मंडे वृत्तसेवा : तालुक्यातील नांदगाव शहरातील गट नंबरच्या क्षेत्रावर मृत्युपत्राद्वारे आजोबांचे नाव लावण्यासाठी तहसील कार्यालयातील लिपिक व त्याचा पंटर यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर असे, नांदगाव तहसील कार्यालयातील लिपिक समाधान निंबा पवार व त्याचा साथीदार नितीन अण्णा सोनवणे (खासगी इसम, रा. होलार वाडा, ता. नांदगाव, जि. नाशिक) यांनी नांदगाव शहरातील सर्व्हे नंबर 765 (नवीन गट नंबर 5), क्षेत्र 5 हेक्टर 81 आर क्षेत्रावर मृत्युपत्राद्वारे तक्रारदाराच्या आजोबांचे नाव लावण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली संपळा लावत त्या दोघांना काल दि. ५ ऑगस्ट रोजी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंच व साक्षीदार यांच्यासमोर रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.