जिल्ह्यात आज पासून १६ मे पर्यंत जमावबंदी लागू, जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापले असून
येणाऱ्या विविध सण, जयंती, धार्मिक कार्यक्रमा निमित्त मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येण्याची शक्यता असल्याने अलीकडे घडलेल्या काही घटनांमुळे जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी गजेंद्र पाटोले यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व (३) अंतर्गत हा आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार ३ मे २०२५ रोजी पहाटे ००.०१ वाजल्यापासून ते १६ मे २०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत संपूर्ण जळगाव जिल्ह्यात जमावबंदी लागू राहील. या कालावधीत पाच किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र जमणे, सभा घेणे, मिरवणूक काढणे, शस्त्र किंवा स्फोटक द्रव्ये बाळगणे, ज्वलनशील साहित्य तयार करणे किंवा प्रसारित करणे, तसेच शांतता भंग करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कृतीवर बंदी घालण्यात आली आहे.
याशिवाय, ८ मे ते १६ मे या कालावधीत विविध सण, जयंती, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांदरम्यान मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशातून वयोवृद्ध, अपंग व वैद्यकीय कारणांसाठी लाठी किंवा इतर सहाय्यक साधनांचा वापर करणाऱ्यांना सूट देण्यात आली आहे. तसेच शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा, धार्मिक व विवाह मिरवणुका यांना यामधून वगळण्यात आले असून, अशा कार्यक्रमांसाठी पोलिस अधीक्षकांची पूर्वपरवानगी आवश्यक राहील. असेही या आदेशात म्हटले आहे.