आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था(TRTI), पूणे या स्वायत्त संस्थेतील नियामक मंडळ व कार्यकारी मंडळातील बिगर आदिवासी संचालकांची तात्काळ हकालपट्टी करून नव्याने पुनर्रचना करण्यात यावी – जयस महाराष्ट्र
मोठा वाघोदा (प्रतिनिधी)। दि.२४/१२/२०१३ आणि दि०३/०९/२०१४ रोजींचे आदिवासी विकास विभागाचे शासननिर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील आदिवासी समुहाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी गतिमानता यावी यासाठी यशदा,पूणे व बार्टी,पूणे यांच्या धर्तीवर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था(TRTI),महाराष्ट्र राज्य, पूणे ही संस्थेच्या ‘रौम्य महोत्सवी’ वर्षांनिमित्ताने सन-२०१३ साली स्वायत्त म्हणून घोषित करण्यात आली आहे. प्रामुख्याने नवनवीन संशोधन व प्रशिक्षण यांची समाज विकासासाठी आवश्यकता ओळखून ते शासकीय पातळीवर कोणत्या प्रकारे राबविण्यात येतील असा उद्देश आहे मात्र यासर्व उद्देशाना धाब्यावर बसवून बिगर आदिवासी अधिकारी व संचालकांनी आपल्या स्वतःच्या संस्थांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी उपयोग केल्याचे दिसून आले आहे.
सध्याच्या नियामक व कार्यकारी मंडळात बिगर आदिवासी डॉ.आर.के.मुटाटकर, मिलिंद बोकील तसेच डॉ.किरण कुलकर्णी हे आयुक्त असताना त्यांच्या मर्जीतील तज्ञ संचालक म्हणून बिगर आदिवासीना सामावून घेतले आहे पुराव्यासाठी यांच्या कालावधीत झालेल्या नियामक व कार्यकारी मंडळाच्या झालेल्या बैठकांचे इतिवृत्त पाहावे.
संस्थेच्या नियामक मंडळ व कार्यकारी मंडळात आदिवासी संचालक सुध्दा आहेत मात्र त्यांना बऱ्याच बैठकांना बोलावले जात नाही व निर्णय प्रक्रियेत सुध्दा सामावले जात नाही ही अतिशय गंभीरबाब असून यावर तात्काळ कार्यवाही केली पाहिजे.
डॉ. किरण कुलकर्णी आयुक्त असतांना आणि श्रीमती. नंदिनी आवडे यांच्याकडे प्रभारी आयुक्त म्हणून कार्यभार असतांना तसेच सद्याच्या आयुक्त पवनीत कौर या सर्वांच्या काळवधीतील आर्थिक निर्णयांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी. तसेच या तिघांसाठी संस्थांकडून चिरीमिरी जमा करण्याचे काम करीत असलेले विनित पवार-लेखाधिकारी व हंसध्वजसोनवणेउपसंचालक यांच्यावर देखिल निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी. केंद्रीय योजना, राज्याचा पैसा आणि संस्था स्वायतेचा पैसा अश्या तीन मार्गाने आलेल्या निधीचा उपयोग कोणाच्या भल्यासाठी करण्यात आला आहे याची देखील चौकशी झाली पाहिजे.
महाराष्ट्र राज्यातील आदिवासी लोकप्रतिनिधी व संघटनांची अशी मागणी आहे की जे बिगर आदिवासी संचालक म्हणून नेमले आहेत त्यांची तात्काळ हकालपट्टी झाली पाहिजे आणि संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कार्यवाही केली पाहिजे तरचआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पूणे या संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आदिवासी विकासाचे उद्दिष्ट पूर्ण होईल अशी मागणी नॅशनल जयस च्या महाराष्ट्र प्रभारी अमित तडवी यांनी मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, मुख्य प्रधान सचिव यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे