लव्ह जिहाद मध्ये आता जन्मठेपेची शिक्षा आणि ५० हजार दंड
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l फसवणूक किंवा जबरदस्तीने धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये आता या पुढे कायदा अधिक कठोर असणार आहे. उत्तर प्रदेश मध्ये आता लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून महिलेचा छळ करणा-या दोषींना जन्मठेपेची शिक्षा होणार आहे.
उत्तर प्रदेश सरकारने अवैध धर्मांतराच्या गंभीर घटना रोखण्या साठी कायद्याची व्याप्ती आणि शिक्षेचा कालावधी वाढविला आहे. अशा प्रकरणांमध्ये आतापर्यंत कमाल १० वर्षांपर्यंत शिक्षा आणि ५० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद होती. धर्मांतरासाठी परकीय निधी दिल्यास आता ७ ते १४ वर्षांचा तुरुंगवास आणि किमान १० लाख रुपयांचा दंड होऊ शकतो.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उत्तर प्रदेश विधानसभेत बेकायदेशीर धार्मिक धर्मांतर प्रतिबंध विधेयक-२०२४ विधानसभेत सादर करण्यात आले. त्या अंतर्गत आता, जर कोणी धार्मिक परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने, कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जीवितासाठी किंवा मालमत्तेसाठी धमकावत असेल किंवा हल्ला केला असेल, लग्न करण्याचे वचन दिले असेल किंवा कट रचला असेल, किंवा अल्पवयीन, स्त्रीकिंवा कोणत्याही व्यक्तीची तस्करी केली असेल तर त्याचा गुन्हा दाखल केला जाईल. त्यात आरोपींना २० वर्षांपेक्षा कमी कारावास किंवा जन्मठेप आणि दंड अशी शिक्षा होईल.
तसेच पीडितेच्या उपचार खर्च आणि पुनर्वसनासाठी न्यायालय दंड म्हणून रक्कम निश्चित करू शकेल. यापूर्वी, धर्मांतरामुळे बाधित व्यक्ती, त्याचे नातेवाईक किंवा जवळच्या नातेवाईकांच्या वतीने एफआयआर दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आता गंभीर गुन्ह्यांप्रमाणेच आता कोणत्याही व्यक्तीला धर्मांतराच्या प्रकरणातही एफआयआर दाखल करता येणार आहे.