ज्या ज्या वेळी शिवसेना फुटली ‘त्या’ फुटीचे ‘मास्टरमाईंड’ शरद पवारच,केसरकरांचा गौप्यस्फोट
नवी दिल्ली,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक केसरकर यांनी आज दिल्लीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शिवसैनिक कधीही शरद पवारांच्या दावणीला बांधला जाणार ऩाही, अशी टीका त्यांनी केली. दिल्लीत राष्ट्रपदीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी एकनाथ शिंदे गटाकडून दीपक केसरकर आज दिल्लीत आहेत.
दीपक केसरकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केलं. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना आशीर्वाद हवे असल्याचं त्यांनी नमूद केलं. केसरकर यांनी शिवसेना फुटीवर भाष्य केलं. ते म्हणाले की, शरद पवारांच्या दावणीला शिवसैनिक कधीही बांधली जाणार नाही. ज्याज्या वेळी शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवारांचाच हात होता, असा आरोप केसरकर यांनी केला. पवारांनी शिवसेना फोडून बाळासाहेबांना यातना का दिल्या, असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला.
शरद पवार यांनी मंगळवारी शिंदे गटाला अनुसरून जनतेला गृहीत धरू नये, अशी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना केसरकर म्हणाले की, जनतेला शरद पवारांनी देखील धरू नये. महाविकास आघाडी सत्तेत असताना त्यांना राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटत होतं, असंही ते म्हणले.
दरम्यान माजी मुख्यमंत्री नारायण राणे, छगन भुजबळ आणि राज ठाकरे यांच्या फुटीमागे शरद पवारांचा हात होता. हे त्यांनी आपल्याला विश्वासात घेऊन सांगितलं होतं, असा दावा केसरकर यांनी केला. ते म्हणाले होते, राणेंना बाहेर पडण्यासाठी आपण मदत केली. मात्र त्यांनी कोणत्या पक्षात जावं याची अट ठेवली नाही. भुजबळांचं सर्वश्रूत आहे. तर राज ठाकरे आणि पवार यांच्याविषयी सर्वांना ठावूक असल्याचा दावा केसरकर यांनी केला.