कोरोनाची तिसरी लाट धडकल्याची केंद्र सरकारची कबुली, महाराष्ट्रासह दहा राज्यांतील रुग्णसंख्येने देशाची चिंता वाढवली
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली,वृत्तसंस्था। कोरोनाने पुन्हा एकदा देशाची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरातसह दहा राज्यांत रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. ही परिस्थिती चिंताजनक आहे, असे सांगून केंद्र सरकारने देशात कोरोनाची तिसरी लाट धडकल्याची कबुली दिली आहे.
तसेच रुग्णवाढ वेळीच आटोक्यात आणण्यासाठी संबंधित राज्यांमध्ये केंद्रीय आरोग्य पथके पाठवली आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी गुरुवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देशातील कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. गुरुवारी देशभरात तीन लाखांवर नवे कोरोनाग्रस्त आढळले, तर पॉझिटिव्हिटी दर 16 टक्क्यांवर गेला आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, गुजरात, दिल्ली, कर्नाटक, तामीळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, ओडिशा, राजस्थान या दहा राज्यांतील रुग्णसंख्येने चिंता वाढवली आहे. देशात सध्या 19 लाख ऑक्टिव्ह रुग्ण असून मागील आठवडाभर दररोज सरासरी 2 लाख 71 हजार नव्या रुग्णांची नोंद होत आहे. 1 जानेवारीला 2 टक्क्यांपर्यंत खाली आलेला पॉझिटिव्हिटी दर 16 टक्क्यांवर उसळला आहे. याबाबत चिंता व्यक्त करीत आरोग्य सचिव भूषण यांनी देशात कोरोनाची तिसरी लाट आल्याचे कबूल केले. या पार्श्वभूमीवर सरकारने दहा राज्यांत केंद्रीय आरोग्य पथके पाठवली असून ही पथके कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत आहेत. लसीकरणामुळे तिसऱया लाटेत गंभीर रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण कमी आहे. दुसऱया लाटेत 30 एप्रिल 2021 रोजी 3 लाख 86 हजार 452 नवीन रुग्ण आढळले होते, तर 3059 जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी 31 लाख ऑक्टिव्ह रुग्ण होते, असे भूषण यांनी यावेळी स्पष्ट केले.
लसीकरणाची व्याप्ती वाढवणार
तिसऱया लाटेचा मुकाबला करण्यासाठी लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. शास्त्रीय पुरावे मिळाल्यानंतर लसीकरणाची व्याप्ती आणखी वाढवली जाईल. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीच्या आधारे 15 वर्षांखालील मुलांच्या लसीकरणाचा निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर कोव्हीशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसी खुल्या बाजारात उपलब्ध करून देण्याबाबत तज्ञांच्या समितीने शिफारस केली आहे. त्यावर औषध नियंत्रक अंतिम निर्णय घेतील, असेही राजेश भूषण यांनी सांगितले.