देशात कोरोनाचा कहर ; सलग दुसऱ्या दिवशी सापडले “इतके” कोरोना रुग्ण
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली,वृत्तसंस्था। देशभरात कोरोना महामारीची तिसरी लाट आलेली आहे. दैनंदिन रूग्ण संख्येत मोठी वाढ सुरू आहे. सलग दुसऱ्या दिवशी देशात दररोज आढळणाऱ्या नवीन कोरोनाबाधितांची संख्या ही अडीच लाखांच्या वर दिसून आली आहे. शिवाय, कोरोनाबाधितांचे मृत्यू देखील होत आहेत. एकीकडे कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलेले असताना, दुसरीकडे कोरोनाचाच नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचा संसर्ग देखील वाढत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात गेल्या 24 तासात 2 लाख 68 हजार 833 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी 4631 कोरोना रुग्ण वाढले आहेत. दिवसभरात 1 लाख 22 हजार 684 जण कोरोनामुक्त झाले आहेत. ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येने 6041 चा टप्पा गाठला आहे. तसेच देशात 14 लाख 17 हजार 820 सक्रिय रुग्ण असून देशाचा कोरोना पॉझिटीव्हीटी रेट 16.66 वर गेला आहे. तर, देशात काल दिवसभरात 402 जणांचा मृत्यू झाला आहे.
तसेच काल दिवसभरात राज्यात ४३ हजार २११ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७१ लाख २४ हजार २७८ इतकी झाली आहे, तर काल दिवसभरात ३३ हजार ३५६ रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ६७ लाख १७ हजार १२५ झाली आहे. तर सध्या राज्यात २ लाख ६१ हजार ६५८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच कोरोनामुळे काल १९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत राज्यातील १ लाख ४१ हजार ७५६ नागरिक दगावले आहेत. तर कालपर्यंत तपासण्यात आलेल्या प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७१ लाख २४ हजार २७८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान काल दिवसभरात राज्यात २३८ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पुणे मनपा १९७, पिंपरी चिंचवड ३२, पुणे ग्रामीण आणि नवी मुंबई प्रत्येकी ३, मुंबई २ आणि अकोला १ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर राज्यात एकूण १ हजार ६०५ ओमायक्रॉन विषाणूबाधित रुग्णांचे रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ८५९ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.