“तिसरं विश्वयुद्ध झाल्यास त्यामध्ये अणवस्त्रांचा वापर होईल आणि ते फार विद्धवंसक असेल,” — रशिया
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली,वृत्तसंस्था। रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी एक सूचक विधान केलं आहे. लावरोव्ह यांनी बुधवारी तिसरं विश्वयुद्ध झालं तर ते नक्कीच अण्विक असेल असं म्हटलंय. “तिसरं विश्वयुद्ध झाल्यास त्यामध्ये अणवस्त्रांचा वापर होईल आणि ते फार विद्धवंसक असेल,” असं लावरोव्ह यांनी म्हंटलंय. त्यामुळे आजच्या आधुनिक जगात अणुयुद्ध झाल्यास काय होईल?, असा प्रश्न पडलास काय होईल.
अण्वस्त्र सतर्कतेचे पुतिन यांचे आदेश
रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे पाश्चिमात्य देशांचा दबाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी २७ फेब्रुवारी रोजी अण्वस्त्र दलास सतर्क राहण्याचे आदेश दिले. नाटो देशांच्या आक्रमक विधानांमुळे आपण हे आदेश दिल्याचे समर्थनही पुतिन यांनी केले. पुतिन यांनी अण्वस्त्र सतर्कतेचे आदेश देताना केवळ ‘नाटो’ देशांच्या कथित विधानांचाच नाही, तर पाश्चिमात्य देशांनी रशियावर लादलेल्या कठोर आर्थिक निर्बंधांचाही उल्लेख केला.
युद्धस्थिती काय?
रशियन सैन्याकडून हल्लासत्र तीव़ करण्यात आला असून मंगळवारपासून खार्कीव्हमध्ये तोफांचा मारा केला जातोय. या ठिकाणी गोळीबारात मोठी जिवीतहानी़ झाली आहे. किव्हमध्ये ६० किमीपर्यंत रणगाड्यांचा ताफा़ सॅटेलाइट फोटोंमध्ये दिसून आलाय. किव्ह शहरात आणखी लक्ष्यभेदी हल्ल्यांचा इशारा रशियाने दिलाय. रशियाने तातडीने हे शहर सोडण्याचं आवाहन केलंय. रशियाने या शहरातील सर्व नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याची सूचना़ केलीय. युक्रेनमधून आतापर्यंत ६ लाख ७७ हजार नागरिकांचे शेजारच्या देशांत स्थलांतर केलं आहे. युरोप युक्रेनबरोबर आहे, हे सिद्ध करण्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचे युरोपीय संसदेतील भाषणात आवाहन केलं आहे.
रशियाकडे किती अणु बॉम्ब?
रशियाकडे विविध क्षमतेचे अणु बॉम्ब आहेत. म्हणजे हिरोशिमा -नागासाकी वर टाकलेल्या अणु बॉम्बच्या संहारक शक्तीपेक्षा हजारपट शक्तीशाली अणुबॉम्ब रशियाकडे आहेत. गेल्या अनेक वर्षातले संशोधन आणि विविध प्रयोगांच्या माध्यमातून एखाद्या मोठ्या बॅगेत सहज राहील अशा आकाराचे, किरणोत्साराचे उत्सर्जन जास्त पण उष्णतेमुळे विध्वंस कमी होईल अशा प्रकारचे अणु बॉम्बही विकसित करण्यात आले आहेत. तेव्हा असेही अणु बॉम्ब रशियाकडे असावेत असा अंदाज आहे. एका अंदाजानुसार रशियाकडे सहा हजारांहून अधिक अणु बॉम्ब आहेत.
अणु बॉम्ब टाकण्यासाठीची सज्जता किती?
रशियाकडे १०० किलोमीटरपासून ते अगदी १० हजार किलोमीटरपेक्षा कितीतरी जास्त अंतरावर अचूक मारा करण्याची क्षमता असलेली विविध क्षेपणास्त्रे आहेत. ही क्षेपणास्त्रे एकाच वेळी विविध क्षमेतेचे अणु बॉम्ब वाहून नेऊ शकतात. गरज पडल्यास शत्रू प्रदेशातल्या भागात घुसत अणु बॉम्ब टाकणारी खास लढाऊ विमाने तसंच टीयू-१६० सारखी बॉम्बफेकी विमाने रशियाकडे आहेत. एवढंच नाही तर शत्रु हल्लाच्या पहिल्याच तडाख्यात जमिनीवरील प्रहार क्षमता नष्ट झाली तर पाण्याखालून क्षेपणास्त्र डागत हल्ला करु शकणाऱ्या विविध अणु पाणबुड्या रशियाकडे आहेत.
अणुयुद्ध झाले तर काय होईल?
द इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबॉलिश न्यूक्लियर वेपन (ICAN) ही स्वित्झर्लंडमधील संस्था आहे. या संस्थेला 2017 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कारही मिळाला आहे. ICAN च्या मते, एक अणुबॉम्ब एका झटक्यात लाखो लोकांचा बळी घेईल. त्याच वेळी, जर 10 किंवा शेकडो बॉम्ब पडले, तर लाखो मृत्यू तर होतीलच पण पृथ्वीची संपूर्ण हवामान व्यवस्था बिघडेल. कोट्यवधी लोकांचे मृत्यू होतील
ICAN च्या मते, एक अणुबॉम्ब संपूर्ण शहर नष्ट करेल. आजच्या काळात अनेक अण्वस्त्रे वापरली गेली तर त्यात करोडो लोक मारले जातील. त्याचवेळी, अमेरिका आणि रशियामध्ये मोठे अणुयुद्ध झाले तर मृतांचा आकडा 10 कोटींचा देखील पुढे असेल. मुंबई, जिथे प्रत्येक एक किलोमीटरच्या परिघात 1 लाखांहून अधिक लोक राहतात, तिथे हिरोशिमासारखा अणुबॉम्ब पडला तर आठवडाभरात 8.70 लाखांहून अधिक मृत्यू होतील. अमेरिका आणि रशिया यांच्यातील अणुयुद्धात 500 अणुबॉम्ब वापरल्यास अर्ध्या तासात 10 कोटींहून अधिक लोक मारले जातील. एवढेच नाही तर जगात सध्या 1% पेक्षा कमी अण्वस्त्रे युद्धात वापरली गेली तरी 2 अब्ज लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर येतील. यासोबतच संपूर्ण आरोग्य यंत्रणाही उद्ध्वस्त होईल, त्यामुळे जखमींना उपचार देखील मिळू शकणार नाहीत.
संपूर्ण पृथ्वीची व्यवस्था विस्कळीत होईल
हिरोशिमावर जो अणुबॉम्ब टाकण्यात आला होता, त्याच आकाराचे जर 100 बॉम्ब टाकण्यात आले तर पृथ्वीची संपूर्ण व्यवस्था बिघडेल. अशा हल्ल्यामुळे हवामान व्यवस्थेवर वाईट परिणाम होऊन शेतीही नष्ट होईल. सध्या जग ग्लोबल वॉर्मिंगशी झुंजत आहे, पण अणुयुद्धामुळे पृथ्वीचे तापमान झपाट्याने कमी होऊ लागेल. कारण या हल्ल्यांमुळे इतका धूर निघेल की पृथ्वीच्या पृष्ठभाग गोठून जाईल. असा अंदाज आहे की जेव्हा असं काही घडेल तेव्हा किमान 10% ठिकाणी सूर्यप्रकाश पोहचू शकणार नाही.
त्याच वेळी, जर जगभरातील सर्व अण्वस्त्रे वापरली गेली, तर पृथ्वीच्या स्ट्रॅटोस्फियरमध्ये 150 मिलियन टन धूर गोठेल. स्ट्रॅटोस्फियर हा पृथ्वीचा बाह्य पृष्ठभाग आहे जो ओझोन थराच्या वर आहे. एवढेच नाही तर जगातील बहुतांश भागात पाऊस पडणार नाही. जागतिक पर्जन्यमान 45% ने कमी होईल आणि यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान -7 ते -8 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. याची तुलना केल्यास 18 हजार वर्षांपूर्वी जेव्हा हिमयुग होतं तेव्हा तापमान -5 डिग्री सेल्सियस होते. म्हणजेच जग 18 हजार वर्षे मागे जाईल.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा