आयात शुल्क कमी केल्याने खाद्यतेलांच्या किमती झाल्या कमी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली,वृत्तसंस्था। कच्च्या आणि परिष्कृत खाद्यतेलांवर आयात शुल्क कमी करण्याच्या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलांच्या किमतीत वाढ झाली असली तरी, देशांतर्गत बाजारात मोहरीचे तेल वगळता खाद्यतेलांच्या किरकोळ किमती कमी झाल्या आहेत. एका सरकारी निवेदनानुसार, आयात शुल्कात कपात केल्यानंतर खाद्यतेलांच्या आंतरराष्ट्रीय किंमती 1.95 टक्क्यांवरून 7.17 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. आयातित खाद्यतेलांवरील शुल्क कमी केल्यानंतर (11 सप्टेंबरपासून) घरगुती किरकोळ किमती 0.22 टक्के ते 1.83 टक्क्यांपर्यंत खाली आल्या आहेत.
केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा परिणाम
मिळालेल्या माहिती नुसार जागतिक किमतींमधील वाढ लक्षात घेता, 10 सप्टेंबरपासून दरांवर निव्वळ परिणाम 3.26 टक्के ते 8.58 टक्क्यांच्या दरम्यान आहे. निवेदनात म्हटले आहे की, शुल्क कमी करण्याच्या संदर्भात केंद्र सरकारकडून आवश्यक धोरणात्मक हस्तक्षेप सामान्य ग्राहकांसाठी फायदेशीर ठरत आहे. तथापि, त्यात असे म्हटले आहे की मोहरीचे तेल हे पूर्णपणे देशी तेल आहे आणि सरकारने घेतलेल्या इतर उपाययोजनांसह त्याच्या किंमती कमी होण्याची अपेक्षा आहे.
केंद्राने खाद्यतेलांवरील आयात शुल्क केले कमी
किंमतींना लगाम घालण्यासाठी आणि देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी केंद्राने खाद्यतेलांवरील आयात शुल्क कमी केले आहे. तसेच होर्डिंगच्या विरोधात पावले उचलली आहेत आणि घाऊक विक्रेते, मिल मालक आणि रिफायनर्सना त्यांच्या साठ्याचा तपशील वेब पोर्टलवर उपलब्ध करण्यास सांगितले आहे. अगदी किरकोळ विक्रेत्यांनाही ब्रँडेड खाद्यतेलांचे दर ठळकपणे दाखवण्यास सांगितले आहे जेणेकरून ग्राहक त्यांच्या आवडीचे खाद्यतेल निवडू शकतील.
पाम तेल, सोया तेल आणि सूर्यफूल तेलावरील मूलभूत सीमाशुल्क कमी
गेल्या महिन्यात सरकारने पाम तेल, सोया तेल आणि सूर्यफूल तेलावरील मूलभूत सीमाशुल्क कमी केले. कच्च्या पाम तेलावरील मूलभूत आयात शुल्क 10 टक्क्यांवरून 2.5 टक्के करण्यात आले आहे, तर क्रूड सोया तेल आणि कच्च्या सूर्यफूल तेलावर हा कर 7.5 टक्क्यांवरून 2.5 टक्के करण्यात आला आहे. इतर खाद्यपदार्थांबाबत सरकारने सांगितले की, एमएसपीमध्ये वाढ होऊनही बाजारात तांदूळ आणि गव्हाचे भाव खाली आले आहेत.