दोन डोस पुरेसे नाहीत; बुस्टर डोसची गरज भासणार : AIIMS
Monday To Monday NewsNetwork।
नवी दिल्ली( वृत्तसंस्था)। कोरोनाच्या विषाणूमध्ये नजीकच्या भविष्यात विविध उत्परिवर्तन होण्याची शक्यता असल्याने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊन थांबता येणार नाही. त्यासाठी पुढील काळात नव्या लसीचे बूस्टर डोस घेण्याची गरज लागू शकेल, अशी शक्यता अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केली आहे. काळापरत्वे माणसांमधील रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूमध्ये बदल झाल्यास त्याला आधी घेतलेले लसीचे डोस संसर्गापासून रोखतीलच, असे सांगता येत नाही. त्यामुळे बूस्टर डोसचा विचार करावा लागेल. या डोसच्या चाचण्या देखील सुरू आहेत. यावर्षीच्या अखेर कदाचित बूस्टर डोस उपलब्ध होतील, असे डॉ. गुलेरिया यांनी सांगितले. कोरोनावरील बूस्टर डोस हे लसीच्या ‘सेकंड जनरेशन’मधील तसेच अधिक संशोधनातून तयार केलेले असल्याने त्याची विषाणूंच्या बदलत्या रुपाला रोखण्याची क्षमता देखील जास्त असेल. त्यामुळे त्याचा लाभ अधिक होईल. परंतु त्यासाठी जास्तीत जास्त लोकसंख्येचे लसीकरण व्हायला हवे. त्यानंतरचा पुढील टप्पा हा बूस्टर डोसचा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारत बायोटेकची मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस येत असून, त्याच्या चाचण्या सुरू आहेत. या लसीचा अंतिम टप्पा सप्टेंबरपर्यंत पूर्ण होऊन लस वापरासाठी उपलब्ध होऊ शकेल. सध्या लशीच्या चाचण्या १२ ते १८, ६ ते १२ आणि २ ते ६ अशा टप्प्यांमध्ये सुरू आहेत. झायडस कॅडिला कंपनी देखील लस तयार करीत असून, त्यांनी लहान मुलांवरील चाचण्यांची माहिती देत, या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. त्यांनी १२ ते १८ या वयोगटाची चाचणी प्रक्रिया पूर्ण केली आहे, असे ते म्हणाले.
येत्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लहान मुलांसाठी लस उपलब्ध होऊ शकेल. त्यानंतर श्रेणी पद्धतीने आपण शाळा सुरू करायला हव्यात. मुलांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर त्यांना संरक्षण मिळेल आणि लोकांना देखील लहान मुले सुरक्षित असल्याचा आत्मविश्वास वाढेल.
— डॉ. रणदीप गुलेरिया, एम्स प्रमुख