ओमायक्रॉन मुळे देशात तिसरी लाट येईल? कोविड सुपरमॉडेल कमिटीने “अशी” शक्यता व्यक्त केली
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली,वृत्तसंस्था। भारतात ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गामुळे २०२२ च्या सुरुवातीलाच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. तसेच फेब्रुवारीत तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू असू शकतो, अशी शक्यता भारताच्या कोविड १९ सुपरमॉडेल कमिटीने व्यक्त केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटे इतकी तिसरी लाट घातक नसेल आणि मृत्यूंचे प्रमाण कमी राहील, असेही कमिटीने नमूद केले आहे.
भारतात दररोज नव्याने आढळणाऱ्या कोरोना रूग्णांची संख्या ७,५०० पर्यंत गेली आहे. बहुतांश रुग्ण डेल्टा बाधित आढळत आहेत. डेल्टाची जागा येत्या काही दिवसांत ओमिक्रॉन व्हेरिएंट घेऊ शकतो. तसे झाल्यास रुग्णसंख्येत वाढ पाहायला मिळेल आणि तिथूनच करोना संसर्गाची तिसरी लाट सुरू होईल, अशी शक्यता राष्ट्रीय कोविड १९ सुपरमॉडेल कमिटी प्रमुख विद्यासागर यांनी व्यक्त केली.
तिसरी लाट आली तरीही भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेले असल्याने या लाटेची तीव्रता अधिक जाणवणार नाही, असेही विद्यासागर यांनी पुढे नमूद केले. सीरो-सर्व्हेनुसार एकूण लोकसंख्येचा विचार केल्यास डेल्टाची लागण होऊन गेली अशा लोकांची संख्या मोठी आहे.
अगदी काही टक्के लोकांनाच विषाणूची लागण झालेली नाही. हीसुद्धा आपल्यासाठी जमेची बाजूच म्हणावी लागेल, असे विद्यासागर म्हणाले. नैसर्गिक प्रतिकारशक्ती, लसीकरणाच्या माध्यमातून मिळालेली प्रतिकारशक्ती या गोष्टीचा किती फायदा होतो यावरही बऱ्याच गोष्टी विसंबून आहेत, असे ते पुढे म्हणाले.