केंद्र सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत कोरोना निर्बंध वाढवले,
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली(वृत्तसंस्था)। देशातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची लक्षणं दिसू लागली आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना निर्बंध ३० सप्टेंबरपर्यंत वाढविले आहे. सणासुदीच्या दिवसात सभा, मेळावे घेऊ नये तसेच गर्दी होऊ देऊ नये याची काळजी घ्यावी, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहे.
कोरोनाचे हे निर्बंध ३१ ऑगस्ट रोजी समाप्त होणार होते. त्यामुळे ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात काही प्रमाणात निर्बंधात सूट देण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. बहुतांश रुग्ण केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि ओडिशा या राज्यांतील आहेत. देशात असे ४१ जिल्हे आहेत ज्यांचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्के आहे, तर दैनंदिन रुग्णसंख्या ३५ ते ४५ हजारच्या दरम्यान आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, दिवाळीपर्यंत म्हणजे सणासुदीच्या काळात हे निर्बंध कायम राहू शकतात. कारण, दररोज एक कोटी लसीकरण झाले तरीही डेल्टा प्लसचा धोका कायम आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांसाठी आणि केंद्रशासित प्रदेशांना स्पष्ट केले आहे की, संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक निर्बंध लागू करण्यात यावेत. गर्दीच्या ठिकाणी नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. चाचण्या, रुग्णांचा शोध, उपचार, लसीकरण आणि नियमांचे पालन या पाचस्तरीय रणनीतीवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.