धक्कादायक “पप्पा,माझ्याकडून मोबाईल तुटला होता,मला माफ करा” मुलीनं उचललं टोकाचं पाऊल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली,मंडे टू मंडे वृत्तसेवा। मोबाइल तुटल्याच्या कारणातून एका दहावीत शिकणाऱ्या मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित मुलीनं आपल्या वडिलांच्या नावानं भावनिक सुसाईड नोट लिहून राहत्या घरात गळफास घेतला.
आत्महत्या करणाऱ्या दहावीतील विद्यार्थिनीचं नाव पूजा असून ती मूळची उत्तर प्रदेशातील रहिवासी होती. मात्र सध्या ती आपले आई-वडील आणि मोठ्या बहिणीसोबत गाझियाबाद येथे राहत होती. मृत पुजाचे वडील ई-रिक्षाचालक आहेत. घटनेच्या दिवशी पुजाची आई आणि मोठी बहीण बिहारला गेली होती. तर वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान घरी एकटीच असताना, तिने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्या वडिलांच्या नावानं एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे.
पप्पा, माझ्याकडून मोबाईल तुटला होता, मला माफ करा “पप्पा, माझ्याकडून मोबाईल तुटला होता, मला माफ करा” असं तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. तिने आपल्या राहत्या घरातील पंख्याला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच, शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाचा पंचनामा केला असता, त्यांना सुसाईड नोट सापडली आहे. या प्रकरणी सिहानी गेट पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस कुटुंबीयांची चौकशी करत आहेत. केवळ मोबाइल तुटल्याच्या कारणातून मुलीनं आत्महत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास सिहानी गेट पोलीस करत आहेत.