श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मेघडंबरीला मढविण्यासाठी दानशूर भक्ताने दिली दोन कोटी किमंतीची २२५ किलो चांदी
पंढरपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सावळ्या विठुरायची मेघडंबरी आता चांदिने मढवली गेलीय . यासाठी नांदेडचे सुमीत मोर्गे परिवार कुटुंबीयानी तब्बल दोन कोटी रुपयांची चांदी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीला दान केली आहे. ही चांदी काही काळापूर्वीच विठ्ठल मंदिर समितीला दान म्हणून आली आहे. याच २२५ किलो चांदीतून सध्या मेघडंबरीवर चांदी चढवली गेली. यासाठी गेल्या एक महिन्यापासून चांदीवर नक्षीकाम सुरू होते. द्वादशी दिवशी अर्थात तीन जुलैला ही चांदी विठ्ठला भोवती मेघडंबरी रूपाने बसवली गेली आहे.त्यामुळे मंदिराचे जतन आणि संवर्धनाच्या कामानंतर विठ्ठलाच्या ऐश्वर्यात आता भर पडली आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. यानिमित्ताने गाभाऱ्यातील पूर्वीची मेघडंबरी काढण्यात आली. त्या ठिकाणी नवीन मेघडंबरी बसवण्यात येत आहे. सागवानी लाकडापासून पंढरपूरमध्येच तयार केलेल्या दोन मेघडंबरी ४ जून रोजी मंदिरात आणण्यात आल्या. त्याला चांदीने मढवण्याचे नियोजन मंदिर समितीने केले होते. नांदेडचे भाविक सुमीत मोर्गेने त्यासाठी मंदिर समितीकडे संपर्क साधून मेघडंबरीसाठी लागणारी २२५ किलो चांदी दान केली, असे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले. पुणे येथील दांगट सराफचे कर्मचारी मेघडंबरीस चांदी मढवण्याचे काम करीत होते
नवीन सागवानी लाकडाची मेघडंबरी श्री संत कबीर महाराज मठ व फडातर्फे ह.भ.प. विष्णू महाराज कबीर यांनी दान दिली आहे. श्री विठ्ठल मूर्तीभोवतीची १६० किलो वजनाची, तर श्री रुक्मिणीमातेभोवतीची ११० किलो वजनाची मेघडंबरी आहे. यासाठी ३० लाख ५० हजार रुपये खर्च आला आहे. ही सागवानी लाकडाची मेघडंबरी घडविण्याचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून पंढरीत सुरू होते. या मेघडंबरीला चांदीने मढविण्यासाठी एका दानशूर भक्ताने दोन कोटी रुपये किमंतीची २२५ किलो चांदी दिली आहे. ही चांदी लाकडी मेघडंबरीवर मढविण्यात आली आहे. यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागला.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गाभार्यातील श्री विठ्ठल-रुक्मिणीभोवती सागवानी लाकडाची, चांदीने मढवलेली मेघडंबरी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत गुरुवारी रात्री उशिरा बसविण्यात आली. मेघडंबरीत विसावलेले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे रूप अधिकच विलोभनीय दिसत आहे.