मुक्ताईनगर मतदारसंघातील अधिकाऱ्यांची आ. पाटील यांनी घेतली आढावा बैठक
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : बळीराजा सुजलाम सुफलाम करायचा असेल तर त्याला अतिशय अडचणीचा विषय असलेल्या शेती रस्ते यांचे जाळे तयार झाले पाहिजे हा उदात्त हेतू मनाशी धरून आमदार चंद्रकांत पाटील हे शासन स्तरावर पाठपुरावा करीत असून त्यांचे अध्यक्षतेखाली याच अनुषंगाने मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी दि.६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ :३० वाजेला महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीत मुक्ताईनगर , बोदवड व रावेर तालुक्याचे तहसीलदार, महसूल मंडळ अधिकारी , तलाठी, जिल्हा परिषद विभागाचे अभियंते तसेच भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
१) पोट खराब क्षेत्र वहिताखाली आणून नोंद करण्यासाठी शासनाचे परिपत्रक असून यानुसार आमदारांनी मागणी केल्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने महसूल विभागाने शिबिरांचे आयोजन करून युद्ध पातळीवर काम सुरू केले आहे. परंतु या कामाला पाहिजे तशी गती मिळाली नसल्याचे तीन आठवड्याच्या कामकाजा वरून दिसून आले. तसेच सांगवा , मांगलवाडी आणि सिंगत या तीन गावांचे १०० % काम पूर्ण होऊन शेतकऱ्यांना सर्टीफिकेट जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे या कामाची बैठकीत कौतुक करण्यात आले. तसेच मतदार संघातील इतर गावांच्या बाबतीत कार्यवाहीत गती आणावी अशा सूचना देण्यात आल्या.
२) मतदार संघातील शेती रस्ते, शिव रस्ते यांची दर्जोंन्नती करून सदरील रस्ते ग्रामीण रस्त्यांमध्ये वर्ग होण्यासाठी कृती आरखडा तयार करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी तलाठी , महसूल मंडळ अधिकारी यांचे मार्फत रस्त्यांची कागदपत्रे, नकाशे व इतर महत्त्वाच्या बाबी प्रस्तावासाठी आवश्यक असल्याने या बैठकीत महसूल मंडळ अधिकारी व तलाठी यांना आवाहन करून प्रस्तावास सहकार्य करण्याचे सांगितले. यामुळे मतदार संघातील १७५ गावांतील शेती रस्त्यांचे जाळे डांबरीकरण करण्यासाठी मदत होईल किमान १ हजार रस्ते करता येतील जेणेकरून शेतकरी बांधवांच्या शेत मालाला वाहतूक करणे सोपे होईल.
३) महत्त्वाचे उतारे, ड पत्रक नोंदी, फेरफार नोंदी, उत्पन्न दाखले व इतर तत्सम दाखले नागरिकांना वेळेवर मिळत नसल्याने ओरड निर्माण झाली असून याबाबतही आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांचेसह मुक्ताईनगर तहसीलदार श्वेता संचेती, रावेर तहसीलदार उषाराणी देवगुने, बोदवड तहसीलदार जितेंद्र कुंवर , यांचेसह तिघेही तालुक्यातील मंडळ अधिकारी, तलाठी , जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.