शुक्रवार रोजी सावदा मंडळातील हजारो शेतकऱ्यांचा रस्तारोको
सावदा, ता.रावेर.मंडे टु मंडे न्युज | सावदा मंडळातील जवळपास सोळाशेहून अधिक शेतकरी २३ जानेवारी शुक्रवार रोजी बऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गावर सावदा — रावेर दरम्यान भारतेश्वर मंदिराजवळ रस्तारोको करणार आहेत.
सावदा कृषी मंडळातील सावदा, थोरगव्हाण, मांगी, चुनवाडे, सुदगाव. रायपूर, गहूखेडे, रणगाव. तासखेडा, उधळी बुद्रुक, उधळी खुर्द, लूमखेडा. येथील केळी पिक विमा संदर्भातील शेतकरी बांधवांची २०२४- २०२५ या वर्षातील केळी पिकविमा परतावा जानेवारी संपत आला असून शेतकरी बांधवांना त्यांचा हक्काचा परतावा अजूनही मिळालेला नसून यासंदर्भात सावदा मंडळातील सर्व शेतकरी मिळून केंद्रीय राज्य मंत्री तथा खासदार रक्षाताई खडसे,माजी मंत्री तथा विधानपरिषद आमदार एकनाथराव खडसे, मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी जळगाव, उपविभागीय अधिकारी फैजपूर, तहसिलदार रावेर तसेच पिकविमा कंपनी जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, यांच्याशी वेळोवेळी निवेदन, भेटी, तसेच संपर्क करूनही पिकविमा परतावा मिळालेला नसून त्यासाठी मंडळातील पिकविमाधारक सर्व शेतकरी वर्ग त्रस्त झालेला आहे.
त्यासंदर्भात दि.२३/०१/२०२६ वार – शुक्रवार रोजी सावदा रावेर रस्त्यावरील भारतेश्वर मंदिराजवळ सकाळी रस्ता रोको आंदोलन करणार असून तसे निवेदनाद्वारे प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस स्टेशन, पिक विमा जिल्हा प्रतिनिधी यांना सूचित करण्यात आले आहे.
त्याआधी पिकविमा परतावा शेतकरी बँक खात्यात वर्ग झाल्यास रस्ता रोको आंदोलन रद्द करू अन्यथा अतिशय तीव्र स्वरूपाचे हे आंदोलन सावदा रावेर रस्त्यावरील भारतेश्वर मंदिर जवळ करण्यात येणार आहे. तेव्हा सर्व पीडित शेतकऱ्यांनी जास्तीतजास्त संख्येने शुक्रवारी सकाळी १०:३० वा आंदोलना ठिकाणी हजर राहण्याचे आवाहन तांदलवाडी येथील शेतकरी शशांक पाटील, सुनील पाटील, राहुल पाटील,योगेश महाजन, दिलीप पाटील,उधळी येथील शेतकरी ललित पाटील,राजेंद्र पाटील, जयवंत राजपूत आदिंनी केले आहे


