सामान्य नागरिक आता जि. प. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी साधू शकेल थेट संवाद
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यातील नागरिकांच्या जिल्हा परिषदेशी संबंधित समस्या, तक्रारी, अडचणी त्वरीत सुटाव्या म्हणून जळगाव जिल्हा परिषदेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली एक महत्त्वपूर्ण आणि अभिनव उपक्रम सुरू केला आहे. आता जिल्ह्यातील नागरिक दररोज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधू शकणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
सामान्य नागरिक आणि ग्रामस्थांना त्यांच्या विविध अडचणी, तक्रारी किंवा उपयुक्त सूचना थेट प्रशासनापर्यंत पोहोचवणे आता अधिक सोपे होणार आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या समस्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता भासणार नाही, ते आपल्या घरी बसूनच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकणार आहेत.
कसा असेल उपक्रम –
वेळ – दररोज सकाळी १० ते ११ या वेळेत नागरिक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधू शकतील.
थेट संपर्क – नागरिकांना जिल्हा परिषदेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी थेट बोलण्याची संधी मिळेल.
तत्काळ निवारण – दररोज वरिष्ठ अधिकारी नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकून घेणार आहेत.
त्वरित कार्यवाही – ऐकलेल्या तक्रारी त्वरित संबंधित विभागाकडे पाठवल्या जातील आणि त्यांच्या निराकरणाची प्रक्रिया तातडीने सुरू केली जाईल.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून आढावा – प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचा नियमित आढावा स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी घेणार असून, समस्यांचे समाधान होईपर्यंत पाठपुरावा करणार आहेत.
प्रभावी यंत्रणा – तक्रारींची जलद नोंदणी आणि प्रभावी निवारणासाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
या थेट संवादासाठी आवश्यक असणारी लिंक आणि QR कोड जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.zpjalgaon.com) उपलब्ध करून देण्यात आला आहे. आता आपल्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे अधिक सुलभ झाले आहे, त्यामुळे नागरिकांनी याचा अवश्य समस्या निवारण साठी उपयोग करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.