मुंबादेवीत बाहेरचा माल चालणार नाही…, मी “महिला” आहे, “माल” नाही. शिंदे गटाच्या महिला उमेदवाराचा संताप
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l शिवसेनेच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांनी ठाकरे गटाच्या नेत्यावर आपल्याला ‘माल’ म्हणून संबोधल्याचा गंभीर आरोप केला आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी राजकारणात सक्षम असलेल्या शायना एनसी याना “माल” म्हणून संबोधले. यावरून त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे स्पष्ट होते, असे शायना एन सी म्हणाल्या.
मुंबादेवीत बाहेरचा माल चालणार नाही असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हाटल्याची ऑडिओ क्लिप समोर आली.
मीडियाशी संवाद साधत शायना एन सी यांनी अरविंद सावंत यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवली. या क्लिपमध्ये अरविंद सावंत शायना एनसी यांचा उल्लेख कथितपणे “माल” म्हणून करताना ऐकू येत आहेत. मुंबादेवीमध्ये बाहेरचा माल चालणार नाही. इथे इथलाच माल चालणार अमिन पटेल, असे सावंत म्हणाल्याचे शायना एनसी यांनी दावा केला आहे.
मी मुंबईची मुलगी आहे. मुंबईकरांची लाडकी आहे. मी मुंबईसाठी काम करणार. मला अरविंद सावंत किंवा उद्धव ठाकरे यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. शायना एनसी यांनी यावेळी मला माल बोलाल, तर हाल होणार असा इशाराही दिला. एका महिलेकडे तुम्ही माल म्हणून पाहता. मी एक सक्षम महिला आहे. मी स्वतःच्या बळावर २० वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहे. त्यानंतरही तुम्ही माझा माल म्हणून उल्लेख करता. यावरून तुमची मानसिक स्थिती स्पष्ट होते. महाराष्ट्रातील महिला आता ठाकरे गटाला मतदान करणार नाहीत. महिलांचा मानसन्मान केला, तरच तुमचा आदर राखला जाईल. अन्यथा तिचा माल म्हणून उल्लेख केला तर तुमचे जे हाल होतील ते २० तारखेला पाहा, असेही शायना एनसी म्हणाल्या.