हृदयद्रावक : लाडू साठी बेशुद्ध पडे पर्यंत विद्यार्थ्याला मारहाण, शिक्षकाच्या क्रूरतेचा कळस
मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। हातात दोन लाडू दिसले म्हणून विद्यार्थ्याला शिक्षकाडून बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केल्याची हृदयद्रावक घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील कारेगाव या आश्रम शाळेत घडली. यामुळे आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.
पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील कारेगाव येथील आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा या शासकीय आश्रम शाळेत नववीत शिकणाऱ्या रुद्राक्ष दत्ता पागी या विद्यार्थ्याला ललित अहिरे या शिक्षकाने येथील शासकीय आश्रम शाळेत बेदम मारहाण केली, या मारहाणींची माहिती प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी दिली आहे. पीडित विद्यार्थाच्या आई-वडिलांनी पोलिसात तक्रार करू नये म्हणून मारहाण करणाऱ्या शिक्षकाने दबाव टाकला होता.
१५ जानेवारी सोमवार रोजी नेहमीप्रमाणे रुद्राक्षही जेवण घेण्यासाठी गेला असताना त्याच्या हातात दोन लाडू शिक्षकाला दिसून आले. त्यावेळी शिक्षकाने रुद्राक्षला प्रश्न विचारला की, तुझ्या हातात दोन लाडू कुठू आले? यानंतर शिक्षकाने रुद्राक्षला काठीने बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली. यानंतर रुद्राक्षला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांना नियमित चहा आणि जेवण देखील मिळत नाही, तसेच विद्यार्थ्यांना आरोग्यसेवाही पुरविल्या जात नाही, असा प्रकार देखील समोर आला होता. या सारख्या प्रश्नांना आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागेल. या असुविधांच्या अभावामुळे अनेक विद्यार्थी पळून जाण्याच्या घटना घडतात.