Breaking | बीडमध्ये पंकजा मुंडेच्या समर्थकांचे राजीनामे : प्रीतम मुंडेंना मंत्रीपदात डावल्यानंतर बीडमध्ये राजीनामासत्र सुरू…
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
बीड, प्रतिनिधी । केंद्रीय मंत्री मंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना सामावून घेतलं नसल्याने नाराज मुंडे समर्थकांकडून भाजपमधील पदाचा राजीनामा सत्र सुरू केला आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे आणि युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला असला तरी या राजीनाम्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. बीडमधील पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य अशा एकूण 14 जणांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे.
खासदार प्रीतम मुंडे यांना भाजपकडून मंत्रीपदापासून डावलल्यानंतर, बीड जिल्ह्यात राजीनामासत्र आता सुरू झाले आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिल्यानंतर, आज जिल्ह्यातील जवळपास १४ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. आज शिरूर कासार तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, सविता रामदास बडे यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाचा तर प्रकाश खेडकर यांनी पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. यासह जिल्ह्यातील भाजपच्या विविध १४ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. दरम्यान प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने , बीड जिल्ह्यातील भाजप गटात मोठी नाराजी आणि अस्वस्थता पसरली आहे. दोन दिवसात तब्बल चौदा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असल्याने, आता आणखीन किती राजीनामे येणार ? आणि आता पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेणार ? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात जम्बो विस्तार झाला आहे. राज्यातून ४ जणांना मंत्रिपद बहाल करण्यात आले आहे. परंतु, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची बहिण खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं आहे. त्यामुळे मुंडे समर्थक कमालीचे नाराज झाले आहे. ‘ही तर फक्त सुरुवात आहे..’असं म्हणत समर्थकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे मुंडे समर्थकांकडून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये गोपीनाथ मुंडे यांचे किती योगदान होते, हे ठणकावून सांगण्यात आले आहे. ही पोस्ट पंकजा मुंडे यांचासाठी काम करणाऱ्या माजी सहकारी संकेत सानप याने लिहिली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला अखेर ओबीसी चेहऱ्याचा विसर पडल्याची टीका प्रकाश शेंडगे यांनी केली. गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रीतम मुंडे तिला मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे भाजपच्या ओरिजनल ओबीसी चेहऱ्यावर अन्याय झालाय. भागवत कराड ओबीसी आणि वंजारी समाजाचे आहेत. पण गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला खरा ओबीसी चेहरा दिला होता. तो मात्र या मंत्रिमंडळात नाही आहे, याकडे प्रकाश शेंडगे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.भाजपने मराठा आणि ओबीस चा राजकारणातला चेहरा महाराष्ट्रातला देण्याचा प्रयत्न केलाय. तर महाराष्ट्रातील ओबीसी आणि मराठा आरक्षण च राजकारण सुरू आहे. त्यामुळे नारायण राणे मराठा समाजाचे नेते आणि कपिल पाटील आगरी समाजाचे तसंच वंजारी समाजाचे भागवत कराड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याची चर्चा आहे. ओबीसी आणि मराठा कार्डचा फायदा भाजपला पुढील राजकारणात व्हावा हा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न आहे.