जळगाव जिल्ह्यात मूकबधिर विवाहितेचा विनयभंग,मोबाईल फोटो वरून ओळखले आरोपीला
पारोळा,जि. जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असताना जिल्ह्यात मुकबधिर असलेल्या विवाहित महिलेचा मध्यरात्री एका तरुणाने विनयभंग केल्याची घटना पारोळा तालुक्यात घडली. आरोपी घटना घडल्या वर पळून गेला असता बोलता येत नसले तरी या मूकबधिर विवाहितेने इशऱ्यानेच ही घटना पतीला समजावून फोटोवरुन अत्याचार करणाऱ्या तरुणासही ओळखले.
पारोळा तालुक्यातील खेडेगावात राहणारे हे दाम्पत्य जन्मापासून मुकबधिर आहे. दाम्पत्य घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले असता मध्यरात्री रोहित अरविंद पाटील हा तरुण छतावर आला. त्याने मुकबधीर असलेल्या या विवाहितेचे तोंड दाबून विनयभंग केला.आणि लागलीच तरुण तेथून पळून गेला होता. यानंतर विवाहितेने आपल्यावर झालेला प्रकार पतीस इशारे करुन सांगितला.
लागलीच सकाळी हे दाम्पत्य पोलिस ठाण्यात गेले. बोलता येत नसल्यामुळे हा प्रकार कोणी केला? याची माहिती पोलिसांना मिळत नव्हती. अखेर गावातील काही तरुणांच्या मोबाइलमधून तिला फोटो दाखवण्यात आले. यात तिने रोहित पाटील याचा फोटो पाहून त्यानेच विनयभंग केल्याचा इशारा दिला. त्यानुसार पारोळा पोलिस ठाण्यात रोहित अरविंद पाटील याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.