रावेर तालुक्यातील प्रवाशाला कार मध्ये बसवून चाकूचा धाक दाखवून लूट
जळगाव अजिंठा चौफुली वरील प्रकार
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील प्रवाशाला तुला रावेरला सोडतो असे म्हणत कारमध्ये बसवून घेत रस्त्यात त्याला चाकूचा धाक दाखवून लूट केल्याची घटना जळगाव मध्ये घडली. रावेर तालुक्यातील निंभोरा येथील सलमान खान अमानउल्ला खान. वय ५२ वर्ष. याला जळगाव येथील अजिंठा चौफुली येथून कार मध्ये बसवून रस्त्यात याच्या खिशातून ९ हजार ७०० रुपये जबरीने काढून घेतले.
मिळालेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील निंभोरा येथील रहिवाशी सलमान खान हे दि. २८ रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास रावेर येथे जाण्यासाठी जळगाव शहरातील अजिंठा चौफुली परिसरात उभे होते. यावेळी त्या ठिकाणी आलेल्या कार मधील चालकाने शंभर रुपये द्या तुम्हाला रावेरला सोडतो असे म्हणत सलमान खान यांना कारमध्ये बसवून घेतले. कार अजिंठा चौफुली येथून भुसावळ कडे रस्त्यावरुन जात असतांना काही अंतरावर गेल्यानंतर कारमध्ये मागच्या सीटवर बसलेल्यांतिघांनी सलमान खान यांचे हात पकडून ठेवले तर एकाने चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातून ९ हजार ७०० रुपये जबरीने काढून घेतले. व सलमान खान यांना तेथेच रस्त्यावर उतरवून दिले. व तेथून ते आरोपी पसार झाले. ही घटना अजिंठा चौफुली ते प्रितम पार्क दरम्यान दिनाक १ मार्च रोजी घडली.
सलमान खान हे लागलीच एमआयडीसी पोलीस स्टेशनला जावून त्यांनी पोलिसांना घडलेली हकीकत सांगितली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चौघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
लागलीच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी उपनिरीक्षक शरद बागल, सफौ अतुल् वंजारी, पोहेकॉ विजय पाटील,किशोर पाटील, नितीन बाविस्कर, रविंड कापडणे, राहूल रगडे, अक्रम शेख,प्रदीप चवरे, छगन तायडे यांचे पथक तयार केले. या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर कारचा नंबर निष्पन्न करीत वाहन चालक शंभू पाटील याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्यात वापरलेले वाहन काढून दिले असून ते पोलिसांनी जप्त केले. तर त्याच्या साथीरांना देखील निष्पन्न केले असून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. या गुन्ह्यातील संशयित हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत.

