पीएम किसान योजनेचा हप्ता ६ वरून ८ हजार, केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मिळणार गोड बातमी?
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पीएम किसान योजनेच्या संदर्भात शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी प्रत्येकी २,००० रुपयांच्या तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये वार्षिक ६,००० रुपये दिले जातात. यातच आता शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या या हप्त्याची रक्कम वाढू शकते. असं इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.
२३ जुलै २०२४ रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. त्या वेळी या अर्थसंकल्पात त्या अनेक महत्त्वाच्या घोषणा करू शकतात. त्या घोषणांमध्ये अर्थमंत्री पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्याची घोषणा देखील करू शकतात.
देशातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ६,००० रुपये वार्षिक हप्त्यात वाढ करून ही रक्कम ८,००० रुपयांपर्यंत केली जाऊ शकते. याबाबतचा सल्ला कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी अर्थमंत्र्यांना दिल्याचे बोलले जात आहे. मात्र आता शेतकऱ्यांना या गोड बातमी साठी येणाऱ्या अर्थसंकल्पाची वाट पाहावी लागणार आहे. असं इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं आहे.