पॉस्को व बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत १ लाख २० हजारांची पोलिसांनी घेतली खंडणी
चाळीसगाव,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | चाळीसगाव शहरातील एका संगणक इन्स्टिट्यूट मालकाकडे ३ लाख रुपये द्या नाही तर तुझ्यासह तुझ्या परिवाराला पॉस्को व बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देत त्यांच्याकडुन १ लाख २० हजार रुपये खंडणी घेतली. चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांना ही घटना कळताच त्यांनी फिर्यादीसह पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून तक्रार दिली आहे. तर पोलिसाच्या घर झडतीत १ लाख २० हजार हस्तगत करण्यात आले आहेत. या संदर्भात खंडणी घेणाऱ्या चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांसह इतरांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १८ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास संगणक इन्स्टिट्यूटचे संचालक व तक्रारदार त्यांच्या क्लासमध्ये असताना दोन पोलीस आले. त्यांनी तक्रारदारांना निखिल राठोड नावाच्या व्यक्तीबद्दल विचारणा केली. राठोड त्यांच्याकडे कामाला असल्याचे तक्रारदारांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी राठोडवर बलात्कारचा गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. तसेच, राठोडने क्लासमध्ये एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करत, जागा मालक आणि त्यांचे भाऊ देखील आरोपी होऊ शकतात, असे धमकावले. तक्रारदारांनी पोलिसांना सांगितले की, त्यांच्या क्लासमध्ये अनेक विद्यार्थी येत असल्याने गैरकृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तसेच, त्यांच्या गैरहजेरीत राठोडने कोणाला आणले याची माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, एका पोलीस कर्मचाऱ्याने तक्रारदाराला बाजूला घेऊन, ‘तू त्याला कामावर ठेवले आणि मदत केली, त्यामुळे तू सुद्धा सहआरोपी होशील’ असे धमकावले. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थीचा मार्ग काढण्यासाठी पैशांची मागणी केली.
घाबरलेल्या तक्रारदारांनी पोलिसांना एक तासाचा वेळ मागितला आणि मित्रांकडून ५० हजार रुपये घेतले. रात्री ८ वाजता संपर्क साधल्यावर पोलिसांनी त्यांना कोर्टाजवळ बोलावले आणि तिथे ५० हजार रुपये घेतले. मात्र, या रकमेत काम होणार नसल्याचे सांगून आणखी पैशांची मागणी केली. आईच्या नावावर जागा असल्याने तिचे नाव गुन्ह्यात येऊ नये या भीतीने तक्रारदारांनी आणखी पैसे देण्याचे कबूल केले. त्यानंतर तक्रारदारांनी मित्रांकडून आणखी ५० हजार रुपये आणि स्वतःकडील २० हजार रुपये जमा करून पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्यांना राष्ट्रीय विद्यालयाजवळ बोलावून ७० हजार रुपये घेतले. त्यानंतर पोलीस स्टेशनला बोलावून नोटीसवर सही घेतली आणि दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी बोलावले.
आज, १९ मे २०२५ रोजी सकाळी तक्रारदारांनी त्यांच्या मित्रांना घडलेला प्रकार सांगितला. मित्रांनी त्यांना पोलिसांविरुद्ध तक्रार करण्याचा सल्ला दिला. पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केल्यावर ८०९७०१७१४३ हा मोबाईल क्रमांक अजय पाटील नावाच्या व्यक्तीचा असल्याचे समजले. तक्रारदारांनी त्याचा फोटो पाहिला आणि त्यानेच पैसे घेतल्याची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी अजय पाटील यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
या संदर्भात आ. मंगेश चव्हाण आपली प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, कायद्याचे रक्षक जर भक्षक होऊन सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरत खंडणी उकळत असतील तर ते कदापिही सहन केले जाणार नाही. प्रकरणाच्या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार करणार असून यात सहभागी सर्व पोलिसांची सनदी दर्जाच्या अधिकारी यांच्याकडून चौकशी करण्याची मागणी करणार आहे. माझी सर्व चाळीसगावकरांना विनंती आहे की, शासन प्रशासनातील कुणीही आपल्याला त्रास देत असेल, कुठेही पैश्यांची मागणी होत असेल, अडवणूक होत असेल, पोलिसांकडून न्याय मिळत नसेल तर आपण विनासंकोच माझ्याशी कधीही संपर्क साधा. मंगेश चव्हाण अश्या नागरिकांच्या पाठीशी कायम उभा राहील याची ग्वाही मी देतो, असेही आ. चव्हाण यांनी सांगितले.