महाराष्ट्रराजकीय

राष्ट्रवादीत राजकीय भूकंप?, छगन भुजबळ मोठा निर्णय घेणार? घडामोडींना वेग..

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ नाराज आले आहेत. छगन भुजबळ यांनी पक्षातील तीन बड्या नेत्यांवर आरोपांची राळ उडवल्यानंतरही राष्ट्रवादीचा एकही नेता भुजबळ यांची समजूत घालण्यासाठी आलेला नाही. त्यामुळे छगन भुजबळ हे राष्ट्रवादीत एकाकी पडल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मंत्री पद न मिळाल्याने राष्ट्रवादीची मुळुखमैदान तोफ छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले असून त्यातच त्यांनी “जहाँ नाही चैना, वहा नाही रहाना” असे सूचक वक्तव्य केले. त्या नंतर येवल्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत छगन भुजबळ यांनी या वेळी “वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा,” असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

भुजबळ आज मुंबईत येणार असून दोन दिवस समर्थकांशी चर्चा करूनच निर्णय घेणार आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाराजी व्यक्त करूनही एकही नेता भेटायला आला नाह, त्या मुळे भुजबळ अस्वस्थ झाले असून त्यामुळेच भुजबळ यांच्या अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भुजबळ आज आणि उद्या मुंबईतील ओबीसी नेत्यांची भेट घेणार आहेत. त्यांची मते जाणून घेणार आहेत. त्यानंतरच ते मोठा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला तर भुजबळांसमोर तीन पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. एक म्हणजे शरद पवार गटात प्रवेश करणं, दुसरं म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करणं आणि तिसरं म्हणजे ओबीसींचं देशव्यापी संघटन उभं करणं. त्यामुळे भुजबळ कोणता पर्याय निवडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!