मोठी बातमी : राज्यातील ZP, पंचायत समित्यांच्या निवडणूका स्थगित !
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : राज्यातील 25 जिल्हा परिषदेची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली असून राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भातील परिपत्रक काढून माहिती दिली आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ मध्ये केलेल्या दुरूस्तीच्या पार्श्वभमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूका स्थगित करण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठीचा मुहूर्त आता 2023 मध्येच लागण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस सरकारने जिल्हा परिषदांमधील वाढीव गट आणि गण यांच्या संख्येत घट केली आहे. ही सारी प्रक्रिया पुन्हा नव्याने राबविण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. कितीही काम वेगाने केले तरी चार महिने आवश्यक आहेत. त्यामुळेच या निवडणुकांसाठी 2023 हेच वर्ष उजाडू शकते, असा अंदाज प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व्यक्त करीत आहेत.
कायद्यानुसार आता निवडणूक आयोगाला राज्य सरकारचे म्हणणे मान्य करावे लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत घेणे कायद्यानुसार आवश्यक आहे. नव्या सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात कोणी न्यायालयात गेले तर तेथेच काहीतरी या प्रकरणावर सोक्षमोक्ष लागू शकतो. अन्यथा या निवडणुका पुढील चार महिन्यानंतरच होण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाने आज होणारी नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची आरक्षण सोडत स्थगित केली. त्याचबरोबर अन्य 14 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात येणारी अंतिम आरक्षणाची अधिसूचनादेखील स्थगित करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.