Breaking : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबाबत लवकरच तोडगा निघणार !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई, प्रतिनिधी : विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबतची कोंडी फुटणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल होत भेट घेतली त्यामुळे आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा आता मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यपालांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि राज्यपालांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली आहे. या चर्चेची माहिती अजित पवार यांनी देताना म्हटलं आहे की, राज्य सरकारने ठराव करुन १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी पाठवली होती. या यादीला अनेक दिवस झाले त्यावर कार्यवाही झाली नसल्यामुळे राज्यपालांना विनंती केली आहे. राज्यपाल नियुक्त आमदाराच्या नियुक्तीचा अधिकार त्यांचा आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत लवकर निर्णय घेतो असे म्हटलं असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
तथापि, १२ जणांच्या यादीतील आक्षेप घेतलेली नाव वगळण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारने केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १२ जणांपैकी काही नावांवर आक्षेप घेतल्याची माहिती असून परंतु, बाळासाहेब थोरात आणि अजितदादा पवार यांनी भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना याबाबतची कोणतीही माहिती दिली नाही. अजित पवार यांनी मात्र बारा आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग लवकरच मोकळा होणार असल्याचे म्हटले आहे.