राज ठाकरेंना जातीव्यवस्थेचा इतिहास माहीत नसावा– राष्ट्रवादीचा पलटवार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई, वृत्तसंस्था: राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यात जातीय अस्मितेचा मुद्दा पुढे आला, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. त्यावर राष्ट्रवादीने पलटवार केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यांच्या ठरलेल्या धोरणानुसार आम्ही राजकारण करतो. मात्र राज ठाकरे यांना हे माहीत नसावे किंवा जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा म्हणून ते अशाप्रकारचे वक्तव्य करत आहेत, असा पलटवार राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.
राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीवर मोठे भाष्य केले, ते म्हणाले होते, हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं आहे का?, असा सवाल राज यांना करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला होता. त्यावर राष्ट्रवादीने हा पलटवार केला आहे. या देशात मनुवादी व्यवस्थेमुळे वर्णव्यवस्था निर्माण झाली आणि त्याअंतर्गत जातीव्यवस्था उभ्या राहिल्या. मात्र यामुळे जातीआधारावर अनेक वर्षे लोकांवर अन्याय होत राहिला हे राज ठाकरे यांना बहुतेक माहीत नसावे, अशी टीका मलिक यांनी केली.
छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी जातीव्यवस्था नष्ट करण्याचे काम केले. समता मुलक समाज घडवण्याचं काम केलं हेही राज ठाकरे यांना माहीत नसावे असा उपरोधिक टोला लगावतानाच राज ठाकरे यांनी अज्ञानातून हे वक्तव्य केले असावे असा चिमटाही त्यांनी काढला.