Video| टीम देवेंद्र पक्षाला मान्य नाही, मी-मी असं चालत नाही ! पंकजा मुंडेंचा फडणवीसांना टोला
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
मुंबई, प्रतिनिधी : टीम देवेंद्र वगैरे असं आमच्याकडे नाही, मी मी असं चालत नाही, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला असून नवीन चेहरे आले, त्यामुळे पक्षाची ताकद वाढणार, असं पक्षाच्या श्रेष्ठींना वाटत असेल, तर माझा त्यावर विश्वास आहे. पक्षाची ताकद वाढली, तर हा निर्णय योग्य ठरेल, असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
जे टीम देवेंद्रमध्ये आहेत, तेच टीम नरेंद्रमध्ये आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे, याबाबत पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, की “टीम देवेंद्रमध्ये कोण कोण आहेत, हे मला माहिती नाही. भारतीय जनता पक्षाला टीम देवेंद्र आणि टीम नरेंद्र हे मान्य नाही. पक्षासाठी पक्ष प्रथम… नाही नाही, राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय, तृतीय मी, असं आमच्याकडे आहे. मीपणा पक्षाला मान्य नाही, आमच्या संस्कृतीला, मी-मी असं मान्य नाही. आमच्या पक्षात आम्ही-आपण असं मानतो, त्यामुळे टीम देवेंद्र आमच्या पक्षाला मान्य नाही. पक्षनिष्ठा माझ्या बापाने संस्कारात दिली आहे. पक्ष हे आमच्यासाठी नातं आहे, आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, त्यांची संस्कृती काढणं माझ्या संस्कृतीत बसत नाही.”
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेल्या महाराष्ट्रातील चौघांपैकी तिघे बाहेरच्या पक्षातून आलेले आहेत, यावरुन पंकजांना प्रश्न विचारण्यात आला. “पक्ष वाढवण्यासाठी बडे नेते काही महत्त्वाचे निर्णय घेत असतात. विधानपरिषदेवरही काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली. महायुतीतही राजू शेट्टी, महादेव जानकर हे आमच्याबरोबर जोडले गेले. नवीन चेहरे आले, त्यामुळे पक्षाची ताकद वाढणार, असं पक्षाच्या श्रेष्ठींना वाटत असेल, तर माझा त्यावर विश्वास आहे. पक्षाची ताकद वाढली, तर हा निर्णय योग्य ठरेल.” असं उत्तर पंकजा मुंडेंनी दिलं. “वंजारी समाजातील कोणी नेता मोठा होत असेल, तर मी त्याच्या पाठीशी आहे आणि राहणार आहे. फक्त मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीने या गोष्टी हाताळल्या, त्या पद्धतीने हाताळावं. कोणा गरीबाला वाटू नये, की हे साहेबांसारखं नाही, एवढी काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. पंकजा आणि प्रीतम मुंडे म्हणजेच वंजारी समाज नाहीये, इतर लोकही आहेत. त्यामुळे आपली आणखी ताकद वाढेल, अशी शुभेच्छा.” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.